उत्तर प्रदेशातील कट्टर आरएसएस नेत्याचा भाजपला रामराम
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये तिकीट वाटपाला सुरूवात झाल्यानंतर राजी-नाराजी समोर येत आहे. ज्या नेत्यांचा तिकीट वाटपात अपेक्षाभंग झालाय, ते नेते पक्षासोबत बंडखोरी करत आहेत. मुथरा जिल्ह्यात भाजपला असाच एका नेत्याचा फटका बसला आहे. मांट विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी न मिळाल्याने एस.के. शर्मा यांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भाजपत केवळ राम नावाने लूट होत असल्याचा आरोपही शर्मा यांनी केला आहे.
भाजपत कुठलीही विचारधारा राहिली नसून प्रामाणिकपणा कोसो दूर गेला आहे. त्यामुळे, आपण भाजप सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. पुढील राजकीय रणनितीसंदर्भात 19 जानेवारी रोजी आपण जाहीरपणे बोलू, असेही शर्मा यांनी म्हटले. भाजपमुळे माझे कोट्यवधी रुपये खर्ची झाले आहेत. २००९ ते २०१९ पर्यंतच्या अनेक निवडणुकांवेळी भाजपने माझ्यासोबत विश्वासघात केला आहे. पक्षासाठी मी निष्ठेनं काम केलं, पक्षाच्या संघटनासाठी जेव्हाही निधी मागण्यात आला, मी निधी दिला. मात्र, पक्षाने मला धोका दिल्याचं शर्मा यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
सन १९८० पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत ते जोडले आहेत. भाजपला मजबूत करण्यासाठी त्यांनी आपलं राजकीय आयुष्य खर्ची केलं. तन-मन-धन स्वाहा झालं, यंदाच्या निवडणुकीत सव्वा लाख मतं घेण्याचं लक्ष्य त्यांनी ठेवलं होतं. गेल्या ५ वर्षांत असं कुठलंही गाव, शहर, परिसर नाही, जेथे मी माझं संघटन मजबूत केलं नाही, असेही ते म्हणाले. मांटमध्ये माझे खच्चीकरण करण्यासाठीच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या फंडातून ५ कोटी रुपये खर्च केले.
दरम्यान, भाजपने युवा नेतृत्व राजेश चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. सन १९८७ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेल्या राजेश चौधरी यांनी विद्यार्थी दशेतूनच राजकारणात प्रवेश केला आहे. सन १९९२ ते १९९८ पर्यंत अभाविपच्या महत्त्वाच्या पदावर त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. सध्या ते उत्तर प्रदेशात भाजपचे प्रवक्ता आहेत.