Top Newsस्पोर्ट्स

हरभजन सिंगची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याने आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ट्विट करून त्याने हा निर्णय जाहीर केला. “सगळ्या चांगल्या गोष्टी एक दिवस संपतात. आज मी माझ्या आवडत्या खेळाला निरोप देत असून निवृत्तीची घोषणा करत आहे. या खेळाने मला ओळख दिली. आयुष्यात क्रिकेटमुळे मला सारं काही मिळालं. २३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत मला अनेकांनी सहकार्य केलं. मला पाठिंबा देणाऱ्या सर्व खेळाडूंचे आणि चाहत्यांचे मनापासून आभार, असं ट्विट करत हरभजनने सर्व प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला.

हरभजनने आयपीएल २०२२ च्या आधी निवृत्तीची घोषणा केल्यामुळे आता तो नव्या हंगामात एखाद्या संघाचा प्रशिक्षक किंवा मेंटॉर म्हणून भूमिका बजावू शकतो. हरभजन गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय संघात नव्हता. त्याने भारतीय संघाकडून शेवटचा सामना २०१६ मध्ये खेळला होता. युएई विरूद्ध आशिया कर टी२० स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच आयपीएलमध्ये चेन्नईने करारमुक्त केल्यानंतर गेल्या वर्षी हरभजन कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. पण कोलकाताकडून त्याला संपूर्ण हंगामात केवळ ३ सामने खेळायला मिळाले होते आणि एकही बळी मिळाला नव्हता.

क्रिकेट जाणकारांच्या मते सध्या तरी हरभजन सिंग एखाद्या आयपीएल संघाच्या फिरकी प्रशिक्षकपदी किंवा मार्गदर्शकपदी दिसू शकतो. तसेच, आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनमध्ये एखाद्या संघाला खेळाडू निवडून देण्यासाठी हरभजनचा अनुभव नक्कीच कामी येऊ शकतो. कारण हरभजनने कोलकाताच्या आधी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन बड्या आणि यशस्वी संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

हरभजन सिंगने आपल्या कारकिर्दीत फिरकीच्या जोरावर अनेक सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. २००१ साली हरभजनने ऑस्ट्रेलिया विरूद्ध इडन गार्डन्सच्या मैदानावर कसोटीत हॅटट्रीक घेतली होती. त्यावेळी त्याचे वय केवळ २१ वर्षे होते. त्या सामन्यानंतर हरभजनला संघात सातत्याने स्थान देण्यात आले. लेग स्पिनर अनिल कुंबळेसोबत हरभजनची चांगली जोडी जमली. या फिरकी जोडगोळीने २००० ते २०१० या कालावधीत संघासाठी महत्त्वाती भूमिका बजावली.

हरभजन सिंगची कारकीर्द

कसोटी सामने – १०३, बळी – ४१७
एकदिवसीय सामने – २३६, बळी – २६९
टी२० सामने – २८, बळी – २५

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button