जळगाव : राज्यात आता नगरपंचायत निवडणुकीचा धुरळा उडालेला असताना जळगावमध्ये शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका विधानानं नव्या वादाला तोंड फुटलं होतं. जळगावमध्ये आयोजित जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना रस्त्यांची तुलना थेट ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी यांच्या गालांशी केली होती. त्यानंतर, ही तुलना चुकीची असल्याचा सूर निघाला आणि अनेक स्तरातून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. यानंतर आता गुलाबराव पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
जर माझ्या वक्तव्यानं कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
हेमा मालिनी यांनीदेखील त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आपल्याला काही फरक पडत नसल्याचं म्हटलं होतं. मला माझे गाल प्रॉपरली आणि सेफली ठेवावे लागतील, असं म्हणत हेमा मालिनी यांनी गुलाबराव पाटील यांच्या विधानावर मिश्कीलपणे प्रतिक्रिया दिली. लालू प्रसाद यादव यांनी काही वर्षांपूर्वी असा ट्रेंड सुरू केला होता. त्यामुळे, त्यांना वाटलं असेल असं काही, पण महिलांबद्दल असं विधान करणं चुकीचं आहे. मला या गोष्टीनं काहीच फरक पडत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.