Top Newsराजकारण

नारायण राणेंकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे. मुंबईतल्या जन आशीर्वाद यात्रेत राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार की नाही, अशी चर्चा उभ्या महाराष्ट्रात रंगली होती. मात्र मुंबईतलं पहिलं भाषण आवरुन राणे थेट शिवाजी पार्कवर गेले आणि बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं.

यावेळी राणेंंसोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, आमदार अतुल भातखळकर, निलेश राणे, तृप्ती सावंत उपस्थित होत्या.

बाळासाहेबही म्हणाले असते, नारायण अशीच प्रगती कर…

मुंबई विमानतळावरुन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करुन नारायण राणे यांची जण आशीर्वाद यात्रा शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाली. यावेळी राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं. नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार की नाही याबाबत उत्सुकता होती. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना स्मृतीस्थळावर जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला होता. मात्र राणेंनी आज नितेश राणे, प्रवीण दरेकर यांच्यासह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन केलं.

यानंतर राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीही माझ्या डोक्यावर हात ठेवून अशीच प्रगती कर असं म्हटलं असतं, असं राणे म्हणाले. शिवसेनेचा मुंबई मनपातील ३२ वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजपचं सरकार येईल, असा विश्वास यावेळी राणे यांनी व्यक्त केला.

हे जनतेचं प्रेम आहे. मला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. पंतप्रधान मोदींसाहेबांमुळे हे पद मिळालं. अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचे आभार. मंत्रिपद मिळाल्याच्या दीड महिन्यांनी मी महाराष्ट्रात आलो आहे. भाजपकडून आज जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला नतमस्तक झालो. माझ्या खात्याकडून जास्त रोजगार कसे तयार होतील, नोकऱ्या उपलब्ध करणं, दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, असं राणे म्हणाले.

मी इथे सावरकरांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी आलो. त्याआधी मी माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर नतमस्तक झालो, नमस्कार केला आणि सांगितलं साहेब तुम्ही आज हवे होते, मला आशीर्वाद देण्यासाठी. मला जे काही मिळालं ते साहेबांमुळे. मला साहेबांनीच घडवलंय, आजही ते असते तर म्हणाले असते नारायण तू असेच यश मिळव, माझा आशिर्वाद आहे आणि डोक्यावर हात ठेवला असता. आज हात डोक्यावर नसला तरी साहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत. त्यामुळे कुणाही दैवताचं स्मारक असो, तिथे विरोधाची भाषा करु नये, भावनांचा विचार करावा, त्यानंतर वक्तव्य करावं, असा सल्ला नारायण राणे यांनी दिला.

विरोधाबाबत डाव्या उजव्याला बोलायला लावू नये, स्वत: बोलावं. आम्ही जशास तसं उत्तर देऊ शकतो. आमची तशी ख्याती आहे. मांजरीसारखं आडवं येऊ नये. येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप जिंकणार. ३२ वर्षांचा पापाचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला. मुंबई महापालिका जिंकणं ही आमची जबाबदारी आहे. ही महापालिका काही झालं तरी आम्ही जिंकणारच, असा निर्धार राणेंनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे आडमार्गाने येऊन सत्तेत बसलेत, आम्ही जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आम्ही शपथ घेतली आहे, त्याचं पालन करु. आम्हाला नियम शिकवण्याची गरज नाही. आम्ही कोरनाचे नियम पाळत आहे, पालन करु. आम्हाला उपदेशाची गरज नाही. जन आशीर्वाद यात्रेचा प्रतिसाद पाहता फारच कमी दिवस राहिले आहेत, वाट पाहा. पाऊस नसता तर शक्तीप्रदर्शन केलं असतं, पाऊस असून इतके लोक आहेत. आमची शक्ती आमच्या विरोधकांना माहिती आहे, असं नारायण राणे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button