
मुंबई : मुंबईत कोविडच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मुंबईतील जाचक ठरणारी रात्रीची संचारबंदी हटविण्यात आली असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. नव्या नियमावलीनुसार मुंबईतील गार्डन, मैदाने खुली खुली करण्यात येणार आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीला आता उद्याने, मैदाने, चौपाटया यांचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळे, आठवडा बाजार सुरू करण्यासाठी देखील मुंबई पालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. थीम पार्क खुली होणार आहेत.
मुंबईतील नियमांमध्ये शिथिलता आणल्याने लग्न करणाऱ्या मंडळींना मोठा दिलासा मिळाला असून आता लग्नाला मोठ्या क्षमतेच्या हॉलमध्ये किमान २०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर सांस्कृतिक कार्यक्रम, स्विमिंग पूल, नाट्यगृह, सिनेमागृह याठिकाणी ५० टक्के उपस्थिती दर्शविता येणार आहे. समुद्र चौपाट्या, मैदाने,उद्याने खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईत कोविड रुग्णांची अचानकपणे वाढ झाल्याने राज्य सरकार व मुंबई महापालिकेने काही निर्बंध लादले होते. नागरिक व राजकीय लोक यांचा संपूर्ण लॉकडाऊनला असलेला विरोध पाहता मुंबईत पूर्णपणे निर्बंध लादले नव्हते. मात्र कोविडच्या रुग्णसंख्येत ज्या प्रमाणे वाढ होत गेली त्याप्रमाणे पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाल्याने पालिकेने निर्बंधात शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला. मुंबईत गेल्या २४ तासात ८०३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. २० हजारांवर गेलेली कोरोना रुग्णसंख्या आता हजारांच्या आत आली आहे. आज मुंबईत १,८०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नव्या नियमावलीनुसार, काय बंद, काय सुरु?
– पर्यटनस्थळे, आठवडी बाजार, समुद्रकिनारे, गार्डन, पार्क सुरु राहणार
– अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेनं सुरु होतील.
– हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची ५० टक्के क्षमतेनं सुरु
– लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी- –
– भजन, धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांना ५० टक्के क्षमतेनं परवानगी