आरोग्य

कोरोनाचा उद्रेक : पंतप्रधान मोदींनी गुरुवारी बोलावली मुख्यमंत्र्यांची बैठक

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे केंद्र सरकार सतर्क आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे मंगळवारी होत असलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी ते 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत बैठक घेणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिल रोजी वाढत्या कोरोना आणि लसीकरणाच्या मुद्द्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. या बैठकीचं आयोजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता ही बैठक सुरु होणार आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्यांनी संचारबंदी लागू केली आहे. तसेच इतरही निर्बंध लागू केले आहेत. अशातच मोदी पुन्हा देशव्यापी निर्णय घेणार का? याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.

देशात पहिल्यांदाच एका दिवसात एक लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत आणि संक्रमित लोकांची संख्या 1.25 कोटींच्या वर गेली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मृत्यूची संख्या कमी झाली आहे. पण सक्रिय प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत आणि सध्या त्यांचा आकडा सात लाखांच्या पुढे गेला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची 1,03,764 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 477 लोकांचा मृत्यू झाला आहेत. 52,825 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ ही चिंताजनक आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे उद्या एक बैठक घेणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली की, सोमवारी नोंदविलेल्या एक लाखाहून अधिक रुग्णांपैकी 81 टक्के रुग्ण हे केवळ आठ राज्यांतील आहेत. सोमवारी देशात नोंदविण्यात आलेल्या एकूण प्रकरणांपैकी महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि पंजाबमधील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात 57,074 (55.11 टक्के) रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर 5250 रुग्णांसह छत्तीसगड दुसर्‍या क्रमांकावर आहे, तर कर्नाटकमध्ये 4,553 रुग्णांची वाढ झाली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, केरळ आणि पंजाबमध्ये देशाच्या एकूण सक्रिय प्रकरणांपैकी एकूण 75.88 टक्के वाटा आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि केरळ या बारा राज्यांत दररोज मोठी वाढ होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. पीएम मोदी यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाच कलमी रणनीती (म्हणजे चाचणी, ट्रेसिंग, उपचार, योग्य कोविड व्यवहार आणि लसीकरण) सांगितली. एवढेच नव्हे, तर ज्या राज्यात अधिक प्रकरणे समोर येत आहेत, अशा राज्यात तातडीने केंद्रीय पथकांना जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button