राज्यपालांनी राजकारणातले प्यादे बनू नये : संजय राऊत

मुंबई : राज्यपालांनी राजकारणातलं प्यादे बनू नये, राज्यांच्या अधिकारावर, कॅबिनेटच्या अधिकारावर जर ते अतिक्रमण करत असतील, तर देशाच्या अधिकारांवर संघराज्यावर हल्ला आहे. १२ आमदारांबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका ही राजकीय आहे, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी १२ आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. हा सगळा खेळ ठरवून चाललेला आहे. राज्यपाल स्वतःच्या मर्जीने या सगळ्या गोष्टी करत नाहीत, त्यांच्यावर दबाव आहे, तो दबाव कोठून असू शकतो हे आपल्याला माहिती आहे, असं म्हणत संजय राऊतांनी केंद्राकडे बोट दाखवलं.
गृहमंत्री अमित शहांनी जसं ३७० कलम हटवलं आणि खूप मोठा इतिहास केला, तसं महाराष्ट्रामध्ये देखील जे १२ आमदारांवर जी राजकीय बंदी घातलेली आहे ती त्यांनी उठवावी, असा सल्ला संजय राऊतांनी राज्यपालांना दिला.
यावेळी संजय राऊत यांना शिवसेनेच्या यूपीएबाबतच्या भूमिकेवर विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, कशाला भूमिका स्पष्ट करायला हवी, भूमिका स्पष्ट करण्याचं कारण काय ? अनेक पक्ष असे आहेत, जे कुठेच नाहीत, पण ते भारतीय जनता पक्षाबरोबरही नाहीत. ज्यांचं कुठेना कुठे तरी वेगळ्या पक्षाबरोबर आघाडी आहे, आणि ती त्या त्या राज्याची व्यवस्था सरकार चालविण्याची निर्माण केलेली आहे, असं संजय राऊतांनी सांगितलं.