आमदारांच्या नियुक्तीबाबत कायद्यात वेळेची निश्चिती नसल्याचा फायदा राज्यपालांनी घेतला : नवाब मलिक

मुंबई: कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. जनहित याचिकेवर कोर्टाने विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील व कोर्टाला कळवतील, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. विधानपरिषदेवर १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत कॅबिनेटने राज्यपालांकडे शिफारस केली होती. या घटनेला सात महिने होत आले तरी निर्णय घेतलेला नाही. मात्र, जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने ही फाईल ड्रॉवरमध्ये ठेवण्यासाठी आहे की निर्णय घेण्यासाठी अशी विचारणा केली आहे. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेणार, याची वाट पहावी लागणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांवर अजूनपर्यंत निर्णय का घेतला नाही ते स्पष्ट करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले आहेत. ६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांकडं शिफारसीद्वारे १२ नावे पाठवली आहेत. यावर राज्यपालांनी हो किंवा नाही असा निर्णय घ्यायला हवा, शिफारसपत्र ड्रॉवरमध्ये ठेवून ते बसू शकत नाही, असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवले.




