राज्यपालांकडून संसदीय अधिवेशनाच्या मागणीची नवीन परंपरा : नाना पटोले
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर दोन दिवसाच्या अधिवेशनाची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील महिला अत्याचाराची परिस्थिती लक्षात आणून देतानाच केंद्राच्या चार दिवसीय अधिवेशनाची मागणी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या मागणीला महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समर्थन दिले आहे. देशातील परिस्थिती पाहता देशपातळीवर केंद्राचे अधिवेशन घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
राज्यपालांनीच विरोधकांच्या सूरात सूर मिसळत संसदीय अधिवेशनाची मागणी करणे ही नवीन परंपरा सुरू झाल्याचेही नाना पटोले म्हणाले. राज्यपाल आणि राजभवन भाजपचे कार्यालय झाले आहे. केंद्राने ज्याठिकाणी विरोधी पक्षातले सरकार आहे अशा ठिकाणी राज्यपालांना नेमले आहे. त्यामुळे अनेक राज्यात राज्यपालांनीही राजीनामे दिले आहेत. केंद्र सरकारकडून राज्यपालांच्या कामात हस्तक्षेप करण्यात येत असल्यानेच अनेक ठिकाणी राज्यपाल बाजुला झाले आहेत. साकीनाका येथे महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना तत्काळ आदेश देत निर्भया पथकांची पोलिस ठाणे निहाय स्थापना करण्याच्या सूचना दिल्या. शासन म्हणून ज्या गोष्टी करता येणे शक्य आहे, अशा सगळ्या गोष्टींसाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारवाईची पाठराखण केली आहे. तसेच केंद्राच्या अधिवेशनाच्या मुद्द्यालाही त्यांनी समर्थन दिले.
गितेंच्या वक्तव्याचे समर्थन
महाविकास आघाडीचा प्रयोग हा सत्तेत येण्यासाठीचा केलेला प्रयोग होता, असे माजी मंत्री अनंत गितेंनी केलेले वक्तव्य योग्य असल्याचेही नाना पटोलेंनी म्हटले. या वक्तव्याला आमचे समर्थन आहे. पण राष्ट्रवादीच्या जन्मासाठी कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला या वाक्यासाठी आमचे समर्थन नसल्याचे नाना पटोलेंनी स्पष्ट केले. सत्ता स्थापनेसाठीचा प्रयोग ही त्यावेळची गरज होती. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हा प्रयोग करण्यात आल्याचेही नाना पटोलेंनी म्हटले आहे. या प्रयोगाची कल्पना ही कॉंग्रेस हायकमांडलाही होती असेही त्यांनी म्हटले आहे.