टोक्यो : भारताची गोल्फपटू अदिती अशोकने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर होती. मात्र पहिल्या तीन फेऱ्यात दुसऱ्या स्थानी असलेल्या अदितीची चौथ्या फेरीतील कामगिरी काहीशी निराशाजनक झाली आणि तिला अखेर चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. टोक्यो ऑलिम्पिकमधील महिलांच्या गोल्फमध्ये पहिल्या फेरीपासून पहिल्या तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवणाऱ्या अदितीने पदकाची आस जागवली होती. मात्र आज चौथ्या फेरीत कामगिरी खालावल्याने तिला पदकाने हुलकावणी दिली.
२०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये अदिती अशोक ४१ व्या स्थानी राहिली होती. त्या स्पर्धेत खेळणारी ती सर्वात तरुण गोल्फपटू ठरली होती. मात्र यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अदितीने जबरदस्त कामगिरी केली. सुरुवातीपासूनच ती दिग्गज खेळाडूंना कडवी टक्कर देत होती. मात्र अखेरच्या क्षणी तिला न्यूझीलंडच्या लिडीया को हिचे आव्हान परतवता आले नाही.
१९९८ मध्ये जन्मलेल्या अदितीने वयाच्या पाचव्या वर्षापासून खेळण्यास सुरुवात केली होती. तिने वयाच्या नवव्या वर्षी तिने राष्ट्रीय विजेतेपद जिंकले होते. तर २०१६ मध्ये तिने व्यावसायिक स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली होती. तसेच काही स्पर्धांमध्ये विजेतेपदही पटकावले होते. मात्र टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तिने मिळवलेले यश हे लक्षवेधी ठरले आहे.