मुंबई: मुंबई हायकोर्टाने आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत हायकोर्टात आज सुनावणी झाली. त्यावेळी हायकोर्टाने सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. कनिष्ठ वेतनश्रेणी संघटनेला संपाच्या मुद्यावरून हायकोर्टाने फटकारले.
कनिष्ठ वेतनश्रेणी संघटनेने एसटी प्रशासनाला संपाची नोटीस दिली होती. त्यानंतर एसटी प्रशासनाने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टात आज या प्रकरणी सुनावणी झाली. संप करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना द्यावे लागतील असा इशारा हायकोर्टाने एसटी संघटनेला दिला. सणासुदीच्या काळात संप करून सामान्य जनतेला वेठीस धरणे योग्य नसल्याचे हायकोर्टाने म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य सरकारला देऊ असेही हायकोर्टाने म्हटले.
संप मागे घेणार नसल्याचा निर्धार एसटी कामगार संघटनेने केला आहे. या मुद्यावर तुरुंगात जावे लागले तरी चालेल, मात्र न्याय मागण्यांसाठी संप करणार असल्याचे कामगार नेत्यांनी म्हटले. एसटी कामगारांच्या संपाबाबत मुंबई हायकोर्टात उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.
भाजपचा आंदोलनाचा इशारा
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण, वेतन व इतर मुद्यांवरून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी, कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनात आता भाजपने उडी घेतली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी मुलांबाळांसह मंत्रालयाबाहेर आंदोलनाला बसतील असा इशारा पडळकरांनी दिला आहे.