भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी स्वातंत्र्य लढ्यात कवडीचा सहभाग नसणार्यांच्या अवलादी हे स्वातंत्र्य अजूनही पचवू शकल्या नाहीत. कुणी देश लिजवर दिल्याचे बरळतात तर कुणी हे स्वातंत्र्य भीक मागून मिळाल्याचा शोध लावत आहेत. *ज्यांच्या पूर्वजांनी कधीच या लढ्यात योगदान दिले नाही उलट इंग्रजांची चाकरी करण्यात, वारंवार माफी मागण्यात धन्यता मानली अशा लोकांना स्वातंत्र्य कळले नाही आणि येणारी शंभर वर्षे ते कळणार पण नाही*. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत ज्यांच्या पोटात प्रचंड कालवाकालव होते असा मोठा समूह आपल्या देशात आता सत्ताधारी आहे. कंगना त्याच समूहाचे शेंडेफळ म्हटले पाहिजे.
अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विषयी काय बोलावे. तोंड उघडले की जी असंबंध बडबड करीत असते. तिचे बोल किती गंभीरपणे घ्यावे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. ज्या देशाचे स्वातंत्र्य भिकेत मिळाले असे जीचे मत आहे त्याच कंगनाने परवा याच देशाचा पद्मश्री हा मानाचा सन्मान स्वीकारला.सत्तेवर असलेल्या संघ परिवारातील एकानेही कंगनाला तिच्या या बेताल वक्तव्याचा जबाब विचारला नाही. कारण भारत आणि त्याचा स्वातंत्र्य लढा याबाबत संघ परिवार भयभीत आहे. ज्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपण किंवा आपल्या पिढ्या कधीच नव्हत्या त्या देशाची थेट सूत्रे यांच्या हातात आल्याने हे बावचळले आहेत. पोटात द्वेषाचा मुरडा आलेला असताना खाण्याचा सोस निर्माण झाल्यावर जसे होते तीच हालत यांची झाली आहे.
संघ परिवार आणि त्यांच्या जेवढ्या संलग्न संस्था आहेत त्या सगळ्यांच्या डोक्यात भारतीय स्वातंत्र्य आणि दीर्घकाळ चाललेला लढा याबाबत स्वतःचे एक तत्त्वज्ञान भरलेले आहे. इंग्रजांच्या तावडीतून भारत सोडून घेताना आपल्या देशात जो जात, धर्म विरहित लढा झाला तोच मुळात संघ परिवाराला मान्य नाही.स्वातंत्र्य लढ्यात ब्राह्मण आणि केवळ हिंदू योद्धे कसे लढले याच्या सुरस कथा आजही संघ शाखांवर ऐकवल्या जातात. त्यावरून भारतीय स्वातंत्र्य लढा यांना कितपत कळला असेल याचा अंदाज येतो. म्हणूनच संघ संस्कारित बेंडक्या अधून मधून डराव डराव करून देशातील नागरिकांचे चित्त विचलित करण्याचा प्रयत्न करीत असतात.
दे दी आझादी, बिना खडग बिना ढाल
साबरमती के संत तुने कर दिया कमाल
या ओळी तर संघ परिवाराच्या कानात गरम शिसे ओतावे तशा परिणाम करतात. यात देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले या काळजीपेक्षा साबरमतीचा संत त्यांना अजूनही भयंकर वेदना देत असतो हे नग्न वास्तव आहे. त्याचा संदर्भ देत आजही ज्येष्ठ स्वयंसेवक दोन तासांचे बौद्धिक घेताना पाहिले की या साबरमती वाल्याने किती खोलवर जखम दिलेली असेल याची कल्पना यायला लागते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांना गांधींचे योगदान नको असते, पण काहीही केल्या ते नाकारता येत नाही हे शेवटी लक्षात आल्यावर ते सशस्त्र क्रांतिकारक भगतसिंग यांना जवळ करतात. प्रसंगी गांधींच्या विरोधातही त्याला उभे करतात मात्र भगतसिंहांचे नास्तिक असणे पुन्हा अडचणीचे ठरते हीच संघ परिवाराची अडचण आहे. *देशाचे स्वातंत्र्य किंवा महापुरुष यांच्यावर आगपाखड करणारी कंगना ही दिवटी काही एकमेव नाही. या परिवारा जवळ अशा बोलघेवढ्या लोकांची खाण आहे*. कुठे कोणता प्यादा वापरावा, कधी तो झाकून ठेवावा यात त्यांनी आचार्य पद मिळवून ठेवले आहे. एकजात सगळे खोटे आहेत. गुरुजींचे विचारधन पाया समजून जी इमारत संघाने उभारली तिचा पाया असत्य, द्वेष आणि घृणा यावर उभा असल्याचे आता देशाच्या लक्षात आले आहे. मात्र, हे सत्य स्वीकारायला हे लोक तयार नाहीत म्हणूनच सज्जनांचा अपमान आणि कंगनासारख्या भ्रमिष्टांना सन्मान मिळायला लागला आहे.