जीडीपी वाढवला म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोल यांच्या दरात वाढ
नाना पटोले यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका

मुंबई : इंधन दरवाढीला केवळ केंद्र सरकारच जबाबदार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले जीडीपीचे आकडे चुकीचे आहेत, असा दावा नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केला. जीडीपी वाढवला म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोल यांच्या दरात वाढ केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना केंद्र सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करून लूट करत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभा सभागृहात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली मते मांडल्यानंतर पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. खासदार मोहन डेलकर आत्महत्या, कोरोना, इंधन दरवाढ आदी मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत हे प्रकरण गंभीर असून, याची योग्य पद्धतीने चौकशी व्हावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. कोरोना काळात राज्य सरकारने चांगले काम केले, असे सांगत लॉकडाऊनसाठी सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. यावेळी बोलताना राज्यपालांच्या अभिभाषणाचे स्वागत करताना नाना पटोले यांनी राज्य सरकारने अनेक चांगल्या गोष्टी केल्याचे ते म्हणाले.