नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. कोरोना प्रश्नावर सर्व विरोधी पक्षांनी संयुक्तपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहे. देशातले संकट पाहता सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करावे, सेंट्रल विस्टा प्रकल्प बंद करुन त्याचा खर्च आरोग्य सुविधांवर करण्यात यावा, पीएम केअर फंडातील निधी कोरोना उपाययोजनांमध्ये खर्च करण्यात यावा तसेच कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरही या पत्रात भाष्य करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेत्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही या विरोधकांमध्ये समावेश आहे.
देशातील वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली जात आहे. अशामध्ये आता सर्व विरोधी पक्षनेते या संकटात एकवटले आहेत. देशातील नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात यावे तसेच नव्या संसद भवनासाठी लागणारा निधी आता कोरोना संकटात खर्च करण्यात यावा अशी मागणी सर्व विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. बेरोजगारांना महिना ६ हजार भत्ता देण्यात यावा अशीही मागणी करण्यात आल्या आहेत.
मोदींना लिहिलेल्या पत्रातील मागण्या : देशातील नागरिकांसाठी परदेशातून किंवा देशांतर्गत जिकडून लसींचे डोस खरेदी करता येईल तिथून करा. लसीकरण मोहिम जलदगतीने बारवण्यात यावी. देशात लसीचे उत्पादन करण्यासाठी अनिवार्य परवाना लागू करा. देशातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी एकुण ३५ हजार कोटींचे बजेट ठेवा. नव्या संसद भवनाचे काम स्थगित करुन त्यासाठी लागणारा निधी कोरोना विरोधात लस आणि ऑक्सीजन खरेदी करण्यासाठी वापरण्यात यावा. पीएम केअर फंडामध्ये जमा असलेला निधी ऑक्सीजन आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी करता वापरण्यात यावा. देशातील सर्व बेरोजगारांना महिना ६ हजार रुपये वितरित करण्यात यावे. गरजूंना मोफत अन्न धान्य पुरवठा करावा. जाचक कृषी कायदे मागे घेण्यात यावे. कृषी कायदे मागे घेतल्यास देशातील शेतकरी जनतेसाठी उत्पादन घेण्यास सुरुवात करेल.
देशातील १२ विरोधी पक्षनेत्यांनी संयुक्तपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, जेडीएसचे नेते एच. डी. देवेगौडा,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी, डीएमके स्टॅलिन, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, सीपीआय नेते डी. राजा आणि सीपीएमचे नेते सीताराम येचुरी या सर्व नेत्यांच्या पत्रावर सह्या आहेत.