राजकारण

माजी आमदार विवेक पाटील यांची २३४ कोटींची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई

मुंबई : पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी आ. विवेक पाटील यांच्याविरोधात न्यायालयात नुकतेच आरोपपत्र सादर केले होते. आरोपपत्रात विवेक पाटील यांच्यावर ६७ बनावट खात्यांच्या माध्यमातून ५६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. विवेक पाटील हे चार वेळा आमदार राहिले आहेत. या प्रकरणात त्यांना ईडीने १५ जून रोजी अटक केली होती. ईडीने आज पाटील यांची २३४ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेत कर्नाळा क्रीडा अकादमी आणि अनेक भूखंड यांचा समावेश आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, ईडीने या प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. २०१९-२० मध्ये, रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड पनवेल मुंबई विरुद्ध ऑडिट करण्यात आले. या ऑडिट दरम्यान असे आढळून आले की बँकेचे तत्कालीन चेअरमन विवेकानंद शंकर पाटील हे बनावट खात्याद्वारे त्या बँकेतून पैसे काढत होते आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा क्रीडा अकादमीमध्ये पैसे टाकत होते. या दोन्ही संस्था विवेक पाटील यांनीच निर्माण केल्या आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता.

ईडीच्या तपासादरम्यान असे आढळून आले, ही फसवणूक २००८ पासून सुरू होती. ईडीच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात पीएमएलए ऍक्ट अन्वये करण्यात आलेल्या तपासात ही फसवणूक ६७ बनावट खात्यांद्वारे करण्यात आली होती आणि ही फसवणूक व्याजासह सुमारे ५६० कोटी रुपयांची होती असल्याचे उजेडात आले. फसवणुकीवर पांघरूण घालण्यासाठी, पैसे वेगवेगळ्या खात्यांद्वारे पाटील यांनी स्थापन केलेल्या नियंत्रित संस्थांच्या अनेक बँक खात्यांमध्ये वळवण्यात आले. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा क्रीडा अकादमी आणि इतर वैयक्तिक फायद्यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून क्रीडा संकुल, महाविद्यालय आणि शाळा यासारख्या मालमत्ता बांधण्यासाठी या पैशाचा वापर करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button