राजकारण

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट; अधिकारी निलंबित

कोलकाता : पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. याचदरम्यान हावडा येथील उलूबेरिया नॉर्थमध्ये एका तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं. उलूबेरिया उत्तरमधून असलेले भाजपचे उमेदवार चिरेन बेरा यांनी आरोप केला की तुलसीबेरियाचे टीएमसी नेता गौतम घोष यांना लोकांनी ईव्हीएम आणि ४ व्हीव्हीपॅटसह पकडलं. त्यानंतर परिसरात तणाव पसरला असंही ते म्हणाले. त्यानंतर केंद्रीय दल आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लोकांवर लाठीमारही करावा लागला. या घटनेनंतर गौतम घोष यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सुरुवातीच्या तपासात ही ईव्हीएम मशीन अतिरिक्त आरक्षित मशिनपैकी वाटत असल्याचं सांगितलं. परंतु या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे आणि याचा अहवाल लवकरच सार्वजनिक केला जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं. या घटनेनंतर एका अधिकाऱ्याचं निलंबनही करण्यात आलं आहे.

यापूर्वी आसाममध्येही घडला होता असा प्रकार

यापूर्वी आसाममध्येही असा प्रकार घडला होता. त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराच्या गाडीतून ईव्हिएम मशीने नेण्यावरुन तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होतं. तसंच या घटनेनं मतदानसाठी असलेल्या ईव्हिएमच्या सुरक्षेला धोका निर्माण केला आहे आणि कायदा व्यवस्थेवरही प्रतिकूल प्रभाव टाकला असल्याचं त्यांनी म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button