माजी न्यायमूर्ती अरुण मिश्रा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष
नवी दिल्लीः सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) नवे अध्यक्ष असतील. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. महेश मित्तर कुमार आणि डॉ. राजीव जैन हे आयोगाचे सदस्य असतील.
याबाबत समितीत असलेले काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षातील नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एससी-एसटी समाजातील प्रतिनिधीला मानवाधिकार आयोगाचा सदस्य न केल्याने त्यांनी आक्षेप घेत बैठकीत नाराजी व्यक्त केली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षपद ६ महिन्यांपासून रिक्त होते
माजी न्यायमूर्ती एच. एल. दत्तू हे गेल्या वर्षी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. गेल्या ६ महिन्यांपासून हे पद रिक्त होते. यामुळे आयोगासाठी पूर्ण काळ अध्यक्ष आणि दोन सदस्यांच्या निवडीसाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय पॅनेलची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेतील विरोधी पक्षातील नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे सहभागी होती. खर्गे यांनी माजी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा आणि इतर दोन सदस्यांच्या नावांवर खर्गे यांनी कुठलाही आक्षेप घेतला नाही. पण आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीबाबत सरकारच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.