राजकारण

छत्तीसगडचे माजी मंत्री, भाजप नेते रजिंदरपाल सिंग भाटिया यांची आत्महत्या

रायपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी परिवहनमंत्री रजिंदरपाल सिंग भाटिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. राजनांदगाव जिल्ह्यातील खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंग भाटिया हे आमदार म्हणून निवडून आले होते. रमण सिंग सरकारच्या पहिल्या कार्यकाळात रजिंदरपालसिंग भाटिया यांना मंत्रिपदही देण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून हटवून सीएसआयईडीसीचे चेअरमन बनवण्यात आले होते.

२००३ मध्ये रजिंदरपाल सिंग भाटिया यांना भाजपाने तिकीट दिले होते. तसेच मंत्रीही बनवले होते. मात्र २००८ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. २०१३ मध्येही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यानंतर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढले होते. मात्र त्यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

मिळालेल्या माहितीनुसार रजिंदरपाल सिंग भाटिया राजनांदगावमधील छुरिया परिसरामध्ये आपल्या धाकट्या भावासह वास्तव्यास होते. रविवार संध्याकाळी ते घरी एकटे होते. कुटुंबीय जेव्हा घरी पोहोचले तेव्हा त्यांना ते गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. त्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रजिंदरपाल सिंग गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तसेच प्रकृतीमुळे चिंतीत होते.

रजिंदरपाल सिंग भाटिया यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. सध्यातरी घटनास्थळावर सुसाईड नोट आढळून आलेली नाही. पोलीस सध्या त्यांच्या कुटुंबीयांकडे अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान, राजिंदरपाल सिंग भाटिया यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button