मुंबई : रत्नागिरी, रायगडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने महाड, चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूरमध्ये महापूर आल्याने हाहा:कार उडाला आहे. महामार्ग व कोकण रेल्वे बंद पडल्याने कोकण ठप्प झाले आहे. महाड, चिपळूण पाण्याखाली गेले असताना हजारो लोक आपल्या घरात अडकून पडले आहेत. त्यांच्या बचावासाठी पुण्यावरून चिपळूणकडे जाणार्या एनडीआरएफच्या टीम कोयनेत अडकल्या आहेत. नवजा मार्गावर दरड आणि झाड पडल्याने टीम अडकून पडली आहे. राज्य शासनाने बचावासाठी दोन हॅलिकॉप्टरची व्यवस्था केली होती.
मात्र, रात्री उशिरापर्यंत ही हॅलिकॉप्टर्स पोहचली नव्हती. चिपळूण शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे. एक महिला पाण्यात बुडाली असुन दुसरी वाहून गेली असे सांगण्यात येते. एकविरा मंदिर भागात राहणार्या एका कुटुंबाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना वृध्द महिलेचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. तर, रत्नागिरी जवळील टेंबे बौध्द वाडी येथे निघालेली आशा प्रदिप पवार या महिलेचा पर्याच्या पाण्यात वाहून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर महिला कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात जात होत्या. मात्र, यावेळी पर्याला पुराचे पाणी आल्याने पर्या ओलांडताना ही घटना घडली आहे.
चिपळूणमध्ये पुराची भीषण परिस्थिती ओढवली असून संपूर्ण चिपळूण शहर खेर्डी, कळंबस्ते, परिसर पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून वशिष्टी व शीवनदीला आलेल्या पुरामुळे चिपळूण जलमय झाले आहे. अंतर्गत रस्त्यांवर तब्बल आठ फुट पाणी भरलेले असल्याने बंद झालेले आहेत. बाजारापेठा व शेकडो घरांमध्ये पाणी शिरले आहे. मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक सुध्दा ठप्प झाली आहे.
रस्त्यावरील बहाद्दुर शेख पूल वहातुकीसाठी बंद झाला आहे. अनेक घरांच्या छप्परांपर्यंत पाणी आल्याने शेकडो घरांची परस्थिती बिकट बनली आहे. हजारो लोक मदतीच्या प्रतीक्षेत असून अजूनही त्यांच्यापर्यंत मदत यंत्रणा पोहोचलेली नाही. शहरातील जुना बाजारपूल,बाजारपेठ, जुने बसस्टॅड, चिंचनाका, मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपूर रोड,एसटी स्टँड, भोगाळे व परशुराम नगर जलमय झाले असुन घरे पाण्याखाली गेली आहेत. साप व मगरींच्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संगमेश्वर बाजारपेठेत, आठवडा बाजार, राम पेठ रोड, गणपती मंदिराजवळ, गदेवखार, भीडे वखार आदी भागात शास्त्री नदीमुळे पुरस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या घरातून नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.
अतिवृष्टी, भरती आणि कोयनेचे पाणी सोडल्यामुळे वशिष्टी नदीला पूर आला, असे आता चिपळूणकरांचे म्हणणे आहे. वशिष्ठी नदीवरील रेल्वेच्या पुलाला पाणी लागले होते. पुराचा धोका लक्षात येताच कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे विविध स्थानकांवर रेल्वे थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.
चिपळूणमध्ये छतावर अडकलेल्या १५ जणांना सुखरुप बाहेर काढले !
चिपळूणला महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी रात्री उशिरा दाखल झाल्या आहेत. चिपळूणच्या कळंबस्ते भागात एका घराच्या छतावर अडकलेल्या १५ जणांची गावकऱ्यांनीच धाडस करुन सुखरुप सुटका केली आहे. कळंबस्ते भागशाळेजवळ जिथे वाशिष्ठीचा प्रवाह भयंकर आहे तिथे रात्रीपासून 15 माणसे घराच्या छतावर अडकली होती. नदीचा प्रवाह जवळच असल्यानं नदी आणि घर एक आहे अशी स्थिती झाली होती. परिसरातील घरं पूर्ण पाण्यात होती. काल पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत लोकं अडकली होती. यात वृद्धांसह लहान मुलं देखील होती. इथं अडकलेल्या लोकांशी कुणाचाही संपर्क होत नव्हता. लोकल टीम तिकडं जाण्याचा प्रयत्न करत होती मात्र प्रवाह जास्त असल्याने जाऊ शकली नाही अशी माहिती संबंधितांच्या नातेवाईकांकडून मिळाली होती. चिपळूणमध्ये एमर्जन्सीसाठी दिलेल्या काही फोन नंबरवर फोन केले असता ते देखील नेटवर्क नसल्याने लागत नव्हते. अशात छतावर अडकलेल्या १५ जणांची रात्रीच्या सुमारास गावकऱ्यांनीच धाडस करुन सुखरुप सुटका केली आहे.
पुण्यातील खडकवासला धरण ओव्हरफ्लो!
खडकवासला धरण तुडूंबं भरल्याने अवघ्या ७ तासांत धरणातील पाण्याचा विसर्ग २४०० क्युसेकवरून २५०३६ पर्यंत वाढवत न्यावा लागलाय. रात्रीतून खडकवासला धरणाचा विसर्ग तब्बल २५ हजार क्यूसेकपर्यंत वाढल्याने पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी ऑगष्ट महिन्यात खडकवासला धरण १०० टक्के भरलं होतं यंदा मात्र तेच धरण २२ जुलैला १०० टक्के भरलं आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत २० दिवस आधीच धरणातून पाणी सोडावं लागलंय.
सातारा जिल्ह्यात भूस्खलन, अख्खं गावच्या गाव हलवण्याचे आदेश
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गुंजाळी नावाच्या गावात भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अख्खं गाव खचल्याची माहिती मिळत आहे. हे अख्खंच्या अख्खं गाव तातडीनं इतरत्र हलवण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. गावातील बहुतांश गावकरी सध्या गाव सोडून सुरक्षित ठिकाणी निघून गेले आहेत. सातारा जिल्ह्यातील गुंजाळीमध्ये अचानक जमीन खचल्याचं दिसून आलं. सुरुवातीला नेमकं काय घडतंय हे कुणालाच कळलं नाही. मात्र जेव्हा जमीन खचू लागली, तेव्हा गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. गावातले लोक सैरावैरा पळू लागले आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आतापर्यंत या घटनेत जीवितहानी झालेली नसली तरी प्रचंड घबराट पसरली आहे.
चिपळूणवर तिहेरी संकट; मदतीसाठी पूरग्रस्तांचा टाहो
चिपळूणमध्ये कुणी स्वयंपाकघरात ओट्यावर दिवसभर उभे आहे, कुणी तासनतास पोटमाळ्याचा आधार घेतला आहे, अगदीच नाईलाज झाल्याने कुणी कौलावर चढून मुसळधार पावसात उभे आहे. जगण्यासाठीची ही धडपड आहे चिपळुणातील पूरग्रस्तांची. पहाटेपासून आलेला महापूर अजून कायम आहे. पुन्हा समुद्राची भरती सुरू झाली आहे आणि पावसाचा जोर कायम आहे. भरीस भर कोळकेवाडी धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने तेथून पाण्याचा विसर्ग कधीही करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ही रात्र पूरग्रस्तांसाठी खूप अवघड ठरली आहे. तब्बल २४ तास पुराचे पाणी कायम असल्याने आणि दिवसभरात लोकांपर्यंत मदत पोहोचलीच नसल्याने पुरात अडकलेले शेकडो लोक मदतीसाठी संदेश पाठवत आहेत. मात्र त्यांच्यापर्यंत मदत गेलेली नाही. पुराच्या पाण्याचा वेग अधिक असल्याने फायबर बोटी त्यात टिकत नाहीत. त्यामुळे पूरग्स्तांना बाहेर काढण्याच्या कामाला गती आलेली नाही. स्थानिक स्वयंसेवी संस्था मदतीला गेल्या असल्या तरी तरी बोटी नसल्याने त्यांच्या मदतीला मर्यादा आल्या. हेलिकॉप्टरने पूरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा पालकमंत्री अनिल परब यांनी केली असली तरी दिवसभरात एकही हेलिकॉप्टर मदतीसाठी आले नाही. वीज नसल्याने सायंकाळनंतर सर्व भाग अंधारला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भयभीत झाले असून मदतीसाठी टाहो फोडत आहेत.
६ हजार प्रवासी अडकले
रायगड,रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे एकीकडे मुंबई-गोवा महामार्ग बंद झाला आहे तर दुसरीकडे कोकण रेल्वेही ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील विविध स्टेशन्सवर सुमारे ६ हजार प्रवासी अडकले आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतरच कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत होणार असून तोपर्यंत या प्रवाशांची रखडपट्टी होणार आहे. याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
रायगडमध्ये दरडीखाली ७२ अडकले?
रायगड जिल्ह्यात महाडजवळ तळीये गावावर दरड कोसळून ३० घरे दबल्याची शक्यता असून त्याखाली ७१ जण गाडल्याची भीती आहे. पावसामुळे तेथे रात्री उशिरापर्यंत मदत पोहोचू शकली नव्हती. पूरस्थितीमुळे सर्व रस्ते बंद असल्याने एनडीआरएफची टीमही तेथे सहाय्यासाठी जाऊ शकलेली नव्हती. रायगड जिल्ह्यात पुराचा सर्वाधिक तडाखा हा महाड, पोलादपूर आणि कर्जत या तालुक्यांना बसला आहे. बिरवाडीपासून चौदा किलोमीटरवरील तळीये गावावर संध्याकाळीसातच्या सुमारास दरड कोसळली. मात्र नेटवर्क नसल्याने तेथून काहीही माहिती मिळू शकली नाही. एनडीआरएफचे पथही पोहोचू शकले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. तेथे जाणाऱ्या रस्त्यांवर नऊ फुटांपर्यंत पाणी असल्याने ते कमी होताच बोटींतून पोहोचण्याचा प्रयत्न करू, असे एनडीआरएफच्या पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सतर्क राहून बचावकार्य करण्याचे उद्धव ठाकरे यांचे निर्देश
हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा दिला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांनी सतर्क राहून बचावकार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले. पावसामुळे कोकणातील नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणार्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
गेल्या २४ तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीबाबत उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी तातडीची बैठक घेतली. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एनडीआरएफच्या तुकड्या, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत असल्याची माहिती दिली.
पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री ठाकरेंना फोन
मुसळधार पावसानं महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरीतील चिपळूणची स्थिती सर्वाधिक बिकट आहे. चिपळूणमधील बाजारपेठा आणि घरांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे हजारो लोकांचा जीव टांगणीला आहे. पुण्यातून निघालेल्या एनडीआरएफच्या टीम अद्याप चिपळूणला पोहोचलेल्या नाहीत. या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये निर्माण झालेली पूरपरिस्थिती याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. परिस्थितीचा सामना करताना केंद्राकडून शक्य तितकी सर्व मदत दिली जाईल असं आश्वासन दिलं. प्रत्येक जण सुरक्षित राहावा यासाठी प्रार्थना करत आहे, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महाड, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर, संगमेश्वर पाण्याखाली
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून सध्या ती ९ मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी ७ मीटर असून ती ७.८ मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या १.७४ मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरांसह परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलविणे, स्थलांतर करणे आणि इतर मदतकार्य जोरात सुरू केले आहे. रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदी धोका पातळी वरून वाहत असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी , उल्हास या नद्याही इशारा पातळीवर वाहायला सुरुवात झाली आहे. महाबळेश्वर परिसरात गेल्या २४ तासांत ४८० मिमी पाऊस झाल्याने सावित्री आणि इतर नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पातही जोरदार पाऊस झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे.