इतर

वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली; वालदेवी धरणावर सेल्फी काढताना सहा जणांचा मृत्यू

नाशिकजवळ दुर्घटना; मृतांमध्ये ५ मुली, १ मुलगा

नाशिक : तरुणांमध्ये सध्या वाढदिवस वेगळ्या आणि हटके पद्धतीत साजरी करण्याचं वेगळं क्रेझ आहे. त्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करुन आयुष्यातील अविस्मरणीय क्षण बनवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांचा हाच प्रयत्न कधीकधी अंगावर येऊ शकतो. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्यांच्यापैकी कुणाचा जीवही जाऊ शकतो. या गोष्टीचा प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी वालदेवी धरणावर गेलेल्या पाच मुली आणि एका मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाथर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सेल्फी काढण्याच्या नादात या सहा जणांचा धरणात पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. मृतांमध्ये ५ मुली तर एका मुलाचा समावेश आहे. सर्व मृतक तरुण हे शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होते. ते नाशिकच्या पाथर्डी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या ग्रुपमधील एका मुलीचा वाढदिवस होता. त्याच निमित्ताने ते वालदेवी धरण येथे गेले. या परिसरात त्यांनी वाढदिवसाचा केक कापला, सेलिब्रेशन केलं. मात्र, सेल्फी काढत असताना काही मुली वालदेवी धरणाच्या कडेला उभ्या राहिल्या. यावेळी त्यांचा पाय सटकला आणि पाण्यात तोल गेला. त्यामुळे त्या धरणात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी बाकीच्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाला. वाडीवऱ्हे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्याला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, ही घटना कळताच या मुलांचे पालक व नातेवाईकांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button