मुंबई: मालाडमधील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून वाद सुरू आहे. भाजपने या नामकरणाला विरोध केला आहे. भाजप नेते राज पुरोहित यांनी तर या प्रकरणी पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. भाजपच्या या मागणीचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. टिपू सुलतानचं नाव दिलं म्हणून अस्लम शेख यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजप करत असेल तर भाजपने सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेतला पाहिजे. राष्ट्रपती कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचा गौरव केला होता. त्यामुळे सर्वात आधी भाजपने त्यांचा राजीनामा घ्यावा. मुंबईत काय करायचं हे मुंबई महापालिका आणि राज्य सरकार पाहून घेईल. तुम्ही काळजी करू नका, असा सणसणीत हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. टिपू सुलतान नामकरण प्रकरणी भाजप नेते राज पुरोहित यांनी अस्लम शेख यांचा राजीनामा मागितला आहे. त्याबाबत राऊतांना विचारलं असता राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजप नेत्यांची अशी भाषा असेल तर पहिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. राजीनाम्याची गोष्ट आहे ना मग तुम्ही राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा मागणार आहात का? कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन या टिपू सुलतानचं सर्वात जास्त गुणगान राष्ट्रपती कोविंद यांनी गायलं होतं. महान योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्य सैनिक वगैरे वगैरे या उपाध्या राष्ट्रपतींनीच लावल्या आहेत. लावल्या ना? मग त्यांचा राजीनामा आधी मागावा आणि इथे काय करायचं मुंबईत त्यासाठी महापालिका आणि सरकार समर्थ आहे. तुम्ही काळजी करू नका. उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करू नका, असा दमच राऊत यांनी भरला.
टिपू सुलतानचं काय करायचं ते आम्ही पाहू. आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत. तुम्ही कशा पद्धतीने इतिहास बदलता, लिहिता, दिल्लीत स्वत:चा इतिहास कसा लिहायला घेतला हे आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगपट्टणम, म्हैसूर राज्य सर्व आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतानने काय अत्याचार, अन्याय केला, ब्रिटिशांसोबत कसा लढा दिला हे सर्व आम्हाला माहीत आहे. आम्हाला सांगायची गरज नाही. आंदोलन करू, महाराष्ट्र पेटवू ही भाषा तुमच्या तोंडी असेल तर या पेटवापेटवीतील महाराष्ट्रातील एक्सपर्ट कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे. पण आम्ही हे करत नाही, असं ते म्हणाले.
दंगल करून दाखवाच, इथे ठाकरे सरकार आहे; संजय राऊत यांचे भाजपला आव्हान
दंगल करून दाखवाच. इथे ठाकरे सरकार आहे, असा सज्जड दमच संजय राऊत यांनी भाजपला भरला आहे. भाजप नेते राज पुरोहित यांनी अस्लम शेख यांचा राजीनामा मागतानाच राज्यात दंगली पेटतील असा इशारा दिला होता. त्यावर संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कोण करणार दंगली? हिंमत आहे का? जे दंगलीची भाषा करत आहेत त्यांनी करून दाखवावी. इथे ठाकरे सरकार आहे. दंगल करून दाखवाच, असा इशारा राऊत यांनी दिला.
नेमकं काय झालं ?
काल महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी मालवणी परिसरातील बागेत नवीन सुविधांचे उद्घाटन केले आणि या बागेला टिपू सुलतानचे नाव देण्यात आले आहे, असे सांगितले. यादरम्यान, भाजप युवा मोर्चा, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाव बदलण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली.
भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात म्हणाले, टिपू सुलतान ऐतिहासिकदृष्ट्या त्याच्या राज्यातील हिंदूंच्या छळासाठी ओळखला जातो. अशा लोकांचा आदर भाजप कधीही स्वीकारणार नाही. बागेला टिपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, असे ते म्हणाले.
कल्याण सिंह यांना जिवंत असताना पुरस्कार का नाही?
यावेळी त्यांनी पद्म पुरस्कारावरून पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. मी फक्त त्यांना आठवण करून दिली. गेल्या काही वर्षात मरणोत्तरच पुरस्कार दिले जात आहे. आज माणूस जिवंत आहे, त्याला पुरस्कार देत नाही. मेल्यावर उद्या देतात. यावर काही तरी धोरण ठरवावं. वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, महात्मा फुले हे अपवाद आहेत. हा सन्मान आहे. पण पद्मश्री आणि पद्मभूषणही मरणोत्तर देत आहात. पद्मविभूषण मरणोत्तर देत आहात. निवडणुका आणि जात धर्म पाहून देता. कल्याणसिंह जिवंत असताना त्यांना पुरस्कार का दिला नाही? मी कल्याण सिंह यांच्याकडे भाजपचे नेते म्हणून पाहत नाही. कल्याण सिंह नसते तर त्या काळात शांतपणे बाबरीचं पतनही झालं नसतं. आम्ही तिथेच होतो. आमचे सैनिक तिथेच होते. कल्याणसिंह, शंकरदयाळ शर्मा, नरसिंह राव हे सर्व सत्तेत होते. त्यामुळे कल्याण सिंह यांना पुरस्कार देण्यासाठी एवढा उशिर का झाला? असा सवाल त्यांनी केला.