मुंबई : मुंबई पोलिसांनी ‘सुल्ली डिल’ प्रकरणात बेंगळुरू येथून २१ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांचा सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत आहे. कालच नवाब मलिक यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तातडीने कारवाईची आदेश दिले होते, महिला आयोगही या प्रकरणावरून आक्रमक झाल्याचे दिसून आले.
मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करुन त्यांची बोली लावून बदनामी करण्याचे प्रकार या अॅपच्या माध्यमातून होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला होता. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही याबाबतचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष देत तातडीनं चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत याप्रकरणात पहिली अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथून एका २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं असून संबंधित तरुण इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्याचं सांगण्यात आलं आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाची माहिती आणि ओळख सांगण्यास मुंबई पोलिसांनी नकार दिला असून प्रकरणाची सखोल चौकशी अद्याप सुरू असल्याचं सांगितलं आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी अज्ञाता विरोधात आयपीसी आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.
राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही याप्रकरणात मुंबईल पोलिसांना पहिलं यश आलं असल्याचं ट्विट केलं आहे. तसंच प्रकरणाची चौकशी सध्या सुरू असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख जाहीर केल्यास प्रकरणाच्या चौकशीला बाधा येऊ शकते, असं म्हटलं आहे. तसंच लवकरच संबंधित प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील सतेज पाटील यांनी दिलं आहे.
महिला आयोग आक्रमक
मलिक यांच्या माहितीनंतर राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या महिलांसंबंधीची माहिती वेगवेगळ्या समाजमाध्यमांवरुन काढून टाकण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच महिलांच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी मदत करणाऱ्या ‘गिटहब’ या प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
‘सुल्ली डील’ नावाच्या ॲपवरून मुस्लीम महिलांचे फोटो, फाईल व त्यासमोर त्यांची किंमत लिहून प्रसारित केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. समाजात तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवायची आणि आपले राजकीय हेतू साध्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत; असे मागील काही दिवसांपासून घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने दिसून येते. तसेच असे ॲप तयार करून संकलित माहितीचा प्रसार करण्यासाठी मोफत व अनियंत्रित प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या ‘गिटहब’वर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाने महाराष्ट्र सायबर विभागाला दिले आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.