पणजी : काँग्रेसनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यास नकार दिल्यानंतर अखेर गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीची घोषणा आज करण्यात आली. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही पक्षांनी काँग्रेसपुढे आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता जास्त वाट न पाहता या दोन्ही पक्षांनी आघाडी जाहीर केलीय. संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेसला टोला लगावत नाराजी व्यक्त केलीय.
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे शेजारच्या गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग राबवत या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी सा प्रयत्न सुरु होता. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू होते. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चाही करण्यात आली होती. मात्र, त्याला काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आज मोठा निर्णय जाहीर केला.
Addressed a joint press conference in goa with @ShivSena MP Shri @rautsanjay61 ji. @NCPSpeaks and ShivSena have decided to contest the Goa Assembly elections together. #GoaElections2022 pic.twitter.com/5KrnYboD94
— Praful Patel (@praful_patel) January 19, 2022
गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहेत, तशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली. ‘महाविकास आघाडीने गोव्यात एकजुटीने लढावे असा आमचा प्रयत्न होता. त्यासाठी काँग्रेसकडे प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, आमचे प्रयत्न व्यर्थ ठरले. आमच्या प्रस्तावावर काँग्रेसचा होकार अथवा नकारही आला नाही. त्यामुळेच आम्ही काँग्रेसशिवाय पुढे जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी आणि शिवसेना गोव्यात एकत्रितपणे निवडणूक लढणार आहे. गोव्यातील सर्व 40 जागा आम्ही लढणार नाही, पण जास्तीत जास्त जागा आम्ही लढू’, असं पटेल यांनी सांगितलं. उमेदवारांची पहिली यादी आम्ही उद्या जाहीर करणार आहोत आणि तीन-चार दिवसांनंतर दुसरी यादी जाहीर केली जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी यावेळी गोव्यात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही तिन्ही पक्षांची आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न होता. महाराष्ट्रात निवडणुकीनंतर आघाडी झाली. मात्र गोव्यात निवडणूकपूर्व आघाडीसाठी आम्ही प्रयत्न केले. आमचे वरिष्ठ नेते काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोलले. मी स्वत: काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा केली. मात्र काँग्रेसने त्यास प्रतिसाद दिला नाही. कदाचित गोव्यात स्वबळावर पूर्ण बहुमत मिळेल, असं काँग्रेसला वाटत आहे. त्यावर आम्हाला काहीही म्हणायचे नाही. आम्ही आता आमचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी गोव्यात एकत्र लढणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. तसंच गोव्यात आम्हाला निश्चितपणे यश मिळेल. आमच्याशिवाय सरकार बनणार नाही अशी स्थिती गोव्यात निर्माण होईल. गोव्याची जनता योग्य तो कौल देईल आणि गोव्यातही महाराष्ट्रासारखं एक सक्षम सरकार येईल याचा आम्हाला विश्वास वाटतो, असा दावाही राऊत यांनी केलाय.
अमित पालेकर ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; केजरीवाल यांची घोषणा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज महत्त्वाची घोषणा केली. अमित पालेकर हे गोव्यात ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे केजरीवाल यांनी जाहीर केले. केजरीवाल यांनी आज गोव्याची राजधानी पणजी येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आप गोव्यातील ४० जागांवर निवडणूक लढवणार आहे.
गोव्यात आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असलेले अमित पालेकर हे वकील आणि समाजसेवक आहेत. अमित पालेकर हे ओबीसी भंडारी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. गोव्यात सुमारे ३५ टक्के लोकसंख्या ही ओबीसी भंडारी समाजाची आहे. अमित पालेकर यांनी ऑक्टोबरमध्ये आम आदमी पक्षात प्रवेश केला. भाजपच्या नेत्या शायना एनसी यांचा गोव्यातील बंगला बेकायदेशीर असल्याचा आरोप करत अमित पालेकर यांनी त्या विरोधात उपोषण केलं होतं. त्यावेळी तो चांगलेच चर्चेत आले होते.
तृणमूल काँग्रेसच्या ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
फातोर्डा मतदारसंघात हेविवेट लढत पहायला मिळण्याचे संकेत असून, खासदार लुईझिन फालेरो हे या मतदारसंघात तृणमूलच्या उमेदवारीवर गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाई यांच्याशी टक्कर देणार आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, त्यात ११ उमेदवारांची नावे आहेत. फातोर्डा मतदारसंघात लुईझिन फालेरो, कुंकळ्ळीत डॉ. जॉर्सन फर्नांडिस, नावेलीत वालंका आलेमाव, बाणावलीत चर्चिल आलेमाव, नुवेंत जुझे काब्राल, कुठ्ठाळीत गिल्बर्ट मारियानो रॉड्रिगीश, पर्येत गणपत गांवकर, कुंभारजुवेत समील वळवईकर, सांत आंद्रेत जगदीश भोबे, हळदोणेत किरण कांदोळकर तर पर्वरीत संदीप वझरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाच्या उमेदवारीची दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
किरण कांदोळकरांची प्रदेशाध्यक्षपदी निवड
तृणमूल काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली असून, किरण कांदोळकर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. अशोक नाईक, डॉ. जॉर्सन फर्नांडिस, फारेल फुर्तादो, कांता गावडे, किशोर नार्वेकर, राजेंद्र काकोडकर, नाफिसा अली, रोहिदास देसाई आणि शिवदास नाईक यांना प्रदेश उपाध्यक्ष बनवले आहे.
राज्याचा वारसा, अभिमान जपू; गोव्यात तृणमूल काँग्रेसचे आश्वासन
तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) गोमंतकीयांना ‘गृहलक्ष्मी’, ‘युवा शक्ती’ आणि ‘माझे घर, मालकी हक्क’ या तीन योजनांची माहिती देण्यासाठी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. येथील पक्ष कार्यालयात एआयटीसीचे नेते प्रख्यात क्रिकेटपटू कीर्ती आझाद आणि टीएमसीच्या नेत्या अविता बांदोडकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
‘जवळपास ६० टक्क्यांपेक्षा जास्त गोमंतकीयांना जमिनीवर हक्क नाही. सुमारे २०,००० मुंडकारांची प्रकरणे अजूनही मामलेदारांकडे प्रलंबित आहेत. आजही राज्यातील ५०,००० हून अधिक कुटुंबांकडे जमीन किंवा घरे नाहीत. त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न ना भाजपने केला, ना काँग्रेसने. परंतु ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली ‘टीएमसी’ने ‘माझे घर, मालकी हक्क’ अभियान लाँच केले आहे. ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ताब्यातील जमीन वा घराची मालकी मिळेल. इतकेच नाही तर बेघर कुटुंबांना ५०,०० हून अधिक अनुदानित घरे दिली जातील’ असे अविता बांदोडकर म्हणाल्या.
बांदोडकर म्हणाल्या, ‘आमच्या घरोघरी जाण्याच्या मोहिमेदरम्यान, घर नसल्यामुळे पिढ्या न पिढ्या त्रस्त असलेल्या लोकांना भेटलो. त्यांचे दुःख आम्हाला संपवायचे आहे.’ या योजनांच्या व्यवहार्यतेची माहिती देताना एआयटीसीचे नेते, क्रिकेटपटू कीर्ती आझाद म्हणाले, ‘गृहलक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक घरातील एका महिलेला ५,००० रुपये प्रती महिना मिळतील.
राज्यात या योजना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि आरबीआय आम्हाला आर्थिक तरतूद उपलब्ध करून देईल. जर आपण गृहलक्ष्मी आणि युवा शक्ती या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर दोघांसाठी लागणारे वार्षिक बजेट एकूण बजेटच्या १० टक्क्यांपेक्षा कमी असेल, जे सहज शक्य आहे. आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर २५० दिवसांत सर्व योजना लागू करू. आमच्या घरोघरच्या मोहिमे दरम्यान, आम्हाला जाणवले आहे की लोक आमच्या आश्वासनांना स्वीकारतात आणि त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.’
तृणमूलवर बाहेरचा पक्ष असल्याचा होत असलेल्या आरोपाबाबत कीर्ती आझाद यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाष बोस हे बंगालचे आहेत की भारताचे? शिवाजी महाराज मराठी की भारतीय? आम्ही बाहेरचे आहोत तर पंतप्रधान मोदी दिल्लीत काय करत आहेत? राज्याचा वारसा जतन करण्यासाठी आणि राज्यात शांतता, समृद्धी आणि बंधुता वाढवण्यासाठी ‘टीएमसी’ प्रयत्न करेल’ असे आझाद म्हणाले.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आमदारांची संख्या वाढली
आपला आमदार हा स्वच्छ पार्श्वभूमीचा, चांगल्या चारित्र्याचा असावा, असे मतदारांना वाटते. मात्र, गेल्या काही वर्षांत राज्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आमदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. २००७ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विविध गुन्हे नोंद असलेले ९ आमदार निवडून आले होते. तर गेल्यावेळी, २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत हा आकडा ११ वर पोहोचला आहे. मावळत्या विधासभेत विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले ११ आमदार कार्यरत होते.
असोसिएशन ऑन डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेने यासंबंधीचा अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार राज्यात २००७ साली निवडून आलेल्या ४० पैकी ९ आमदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे नोंद होते. यात अपहरण, बलात्कार, खुनाचा प्रयत्न करणे, लैंगिक अत्याचार तसेच अन्य अजामीनपात्र गुन्ह्यांचा समावेश आहे. याप्रकरणी या आमदारांवर विविध पोलीस स्थानकांत गुन्हे नोंद आहेत.
दहा वर्षांपूर्वी, २०१२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली. ९ वरून हा आकडा १२ वर पोहोचला. या १२ आमदारांपैकी २ आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. अजूनही काही प्रकरणांमधील त्यांच्यावरील खटले निकाली काढण्यात आलेले नाहीत.
गेल्यावेळी, २०१७ साली झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या ४० पैकी ११ आमदारांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. या ११ पैकी ९ आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यापैकी बहुतेक जण हे यंदा, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा नशीब आजमावणार आहेत. ९ आमदारांमध्ये भाजपचे पाच, काँग्रेसचे दोन तर गोवा फॉरवर्ड व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश असल्याचे एडीआरच्या अहवालात नमूद आहे.
काँग्रेसकडून ११ उमेदवार घोषित; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरुद्ध धर्मेश सगलानी
उमेदवारी देण्याच्या बाबतीत तरी काँग्रेसने भाजपला मागे टाकले आहे. काँग्रेसने आणखी ११ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. साखळीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरुद्ध धर्मेश सगलानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नुवेंत माजी मंत्री आलेक्स सिक्वेरा तर मुख्यमत्र्यांच्या मतदारसंघात धर्मेश सगलानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पर्वरीत रोहन खंवटे यांच्या विरोधात विकास प्रभुदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे, थिवीत अमन लोटलीकर, सांत आंद्रेत अँन्थनी फर्नांडिस, वेळीत सावियो डिसिल्वा तर काणकोणमध्ये जनार्दन भंडारी या नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. अपेक्षेनुसार कळंगुट मतदारसंघात मायकल लोबो, मडकईत लवू मामलेदार, सांगेतून प्रसाद गांवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ९ उमेदवारांत पाच चेहरे नवीन आहेत. मुख्यमत्र्यांच्या मतदारसंघात धर्मेश सगलानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पर्वरीत रोहन खंवटे यांच्याविरोधात विकास प्रभुदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे, थिवीत अमन लोटलीकर, सांत आंद्रेत अँथनी फर्नांडिस तर काणकोणमध्ये जनार्दन भंडारी या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अपेक्षेनुसार कळंगुट मतदारसंघात मायकल लोबो, मडकईत लवू मामलेदार, सांगेतून प्रसाद गांवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काणकोणात तिरकी चाल
काणकोण मतदरसंघात उमेदवारीच्या शर्यतीत होते ते महादेव देसाई आणि चेतन देसाई; परंतु यांच्यापैकी कुणा एकाला उमेदवारी दिल्यास बंडखोरीचे स्पष्ट संकेत दिसत होते. त्यामुळे एक अनपेक्षित निर्णय घेताना जनार्दन भंडारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भंडारी हे काँग्रेसचे निष्ठावान नेते असून उमेदवारीसाठी त्यांनी कधीच दावा केला नव्हता.