डोंबिवलीतील खड्ड्यांवरून शिवसेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये राडा
कल्याण-डोंबिवली : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सरकार स्थापन केलं आहे. पण तरीही स्थानिक पातळीवर या पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने एकमेकांसोबत जुळलेली नाहीत. याचा प्रत्यय डोंबिवलीत बघायला मिळाला आहे. डोंबिवलीत रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जीवघेणी हाणामारी झाली. या हाणामारीआधीचा बाताबाचीचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या हाणामारीत काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पण या घटनेमुळे कल्याण डोंबिवलीचे राजकारण चांगलंच तापलं आहे.
डोंबिवलीतील मिलापनगर परिसरात रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरु आहे. या कामाच्या दर्जाबाबत चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. वादानंतर जोरदार हाणामारी सुरु झाली. या घटनेत चार ते पाच कार्यकर्ते जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आपसात भिडल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
डोंबिवली एमआयडीसी भागातील मिलापनगर परिसरात रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम सुरु आहे. या दरम्यान आज दुपारच्या सुमारास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन निकृष्ट दर्जाचे काम असल्याचा आरोप केला. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. काही क्षणात या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत जाब विचारल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी दादागिरी करत मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तेजस पाटील यांनी केला आहे. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
या भागातील माजी नगरसेविका पूजा म्हात्रे यांचे पती आणि युवा सेना पदाधिकारी योगेश म्हात्रे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम सुरु असलेल्या ठिकाणी आले होते. त्यांनी कामाच्या दर्जाबाबत विचारणा केली असता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेला विचारा असे सांगितले. याचाच राग येऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना मारहाण केली, असा आरोप योगेश म्हात्रे यांनी केला आहे