राजकारण

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यु काळे यांची तडकाफडकी बदली

मुंबई : कोरोनाच्या संकट काळात रेमडेसिवीर इंजेक्शनचा झालेला तुटवडा आणि लस उत्पादक कंपन्यांचा काळाबाजार अशी प्रकरणे उघडकीस आली. यासारख्या प्रकारामुळेच अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) चे आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने मंगळवारी घेतला. रेमडेसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून लस उपलब्ध करून घेण्यात आलेल्या अपयशाचा फटका काळे यांना बसल्याची चर्चा आहे. अभिमन्यू काळे यांच्याकडे असलेली आयुक्तपदाची जबाबदारी आता परिमल सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे.

राज्यात रेमडेसिवीरच्या टंचाईमुळे अनेक कोरोना रूग्णांचे हाल संपूर्ण राज्यभरात झाल्याचे गेल्या दिवसांपासूनचे चित्र आहे. त्यामुळेच राज्य सरकारविरोधातही जनतेमध्ये रोष असल्याचे चित्र आहे. भाजप पदाधिकाऱ्यांकडे सापडलेल्या इंजेक्शनच्या साठ्यामुळे एकीकडे सरकार आणि विरोधक यांच्यात वारंवार शाब्दिक वार झाल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. त्यामध्येच राज्यातील विविध ठिकाणी आढळलेले रेमडेसिवीरचे साठे या संपुर्ण परिस्थित नवा संभ्रम निर्माण करणारे आहेत. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसात गुजरातमधील कंपनीच्या साठेबाजीच्या पोलखोलमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामध्येच मंगळवारीही त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे रेमेडेसिवीरचा साठा असल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली. या सगळ्या आरोपांचे भाजपने खंडन केले आहे. पण रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांकडून लस उपलब्ध करून घेण्याची परिस्थिती हाताळण्याचे अपयश आल्याचा फटकाच अभिमन्यू काळे यांना बसला आहे. त्याचाच भाग म्हणजे अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून झाल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button