
मुंबई : केंद्र सरकारच्या तीन सुधारित कृषी कायद्यांना विरोध दर्शवत मागील जवळपास दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. त्या अनुषंगाने दिल्ली येथे बंदोबस्त वाढविण्यात आला आहेच शिवाय राज्यातील शेतकरी संघटना आणि काही पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे बाजार समित्या, शहरातील मुख्य मार्केट यावर परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. कॅांग्रेस पक्षानेही आंदोलनाला पाठिंबा दिला असून स्थानिक पातळीवरही पोलीस बंदोबस्त राहणार आहे.
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या ४० शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने लोकांना भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. दुसरीकडे, दिल्ली सरकारने भारत बंदला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीत सोमवारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच दिल्ली शहराच्या सीमेवर तीन ठिकाणी आंदोलन करणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, दिल्लीत भारत बंदची हाक नाही, पण आम्ही सध्याच्या घडामोडी पाहता, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आम्ही सुरक्षा दले तैनात केले आहेत.
लोकशाही आणि संघराज्य तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी राजकीय पक्षांनी देखील भारत बंदमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केलं आहे.
आम आदमी पक्षाचा आंदोलनाला पाठिंबा
दिल्लीतील आम आदमी पक्षाने संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, असे असले तरी एकाही शेतकऱ्यास दिल्लीकडे येऊ दिले जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा देणार असल्याचं आम आदमी पार्टीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सत्ताधारी भाजप हा अन्नदात्याचा आवाज दाबण्यासाठी हुकूमशाहीचा अवलंब करत आहे. भाजपला याची किंमत मोजावी लागेल, असंही आपने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
अत्यावश्यक सेवा राहणार सुरु
संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदच्या घोषणेमुळे सोमवारी सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालये, शैक्षणिक आणि इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहणार आहेत. पण सर्व आपत्कालीन सेवा, रुग्णालये, औषधाची दुकानं, मदत आणि बचाव कार्य आणि वैयक्तिक आपत्कालीन परिस्थिती असलेल्या लोकांना बंदमधून वगळण्यात आलं असल्याचं संयुक्त किसान मोर्चाकडून सांगण्यात आलं आहे.
हरियाणातील बाजार समित्याही बंद राहणार
हरियाणा प्रदेश व्यापार मंडळाने २७ सप्टेंबर रोजी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या (भारत बंद) समर्थनार्थ बाजार समित्यांचाही संप (मंडी संप) जाहीर केला आहे. दुपारी चार वाजेपर्यंत बाजार समित्यांमध्ये देखील कामकाज होणार नाही. शेतकरी आणि अधिकाऱ्यांशी बोलताना संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष बजरंग गर्ग म्हणाले की, व्यापार मंडळ शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी आहेत. शेतकरी (शेतकरी) आणि व्यापारी यांचे न तुटणारे संबंध आहेत. त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा राहणारच आहे.
आंदोलनाची सद्यस्थिती :
– लाल किल्ल्याच्या दोन्ही बाजूंनी रस्ते बंद
– अमृतसरमध्ये आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त
– शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून कृषी कायद्यांना काळा झेंडा
– गाजीपूर बॉर्डरवर शेतकरी एकवटले; उत्तर प्रदेशातून गाजीपूरकडे येणारा रस्ता बंद
– दिल्ली मेरठ हायवे बंद