Top Newsराजकारण

शेतकरी-कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

कोल्हापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे सोमवारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षांच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती रविवारी अत्यंत गंभीर बनली होती. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यांची प्रकृती उपचारास फारसा प्रतिसाद देत नव्हती. अखेर उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे.

वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती म्हणून प्रा. एन. डी. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिथे गेल्यावर त्यांना लागोपाठ दोनवेळा ब्रेन स्ट्रोक आल्याने बोलणे बंद झाले. डॉक्टर त्यांच्या उपचारावर बारकाईने लक्ष ठेवून होते. प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती ढासळत होती. गेल्या चार दिवसांपासून त्यांची शुद्ध हरपली होती. त्यांची प्रकृती उपचारास फारसा प्रतिसाद देत नव्हती. अखेर उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले.

एन. डी. पाटील यांनी गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ शेतकरी, कष्टकरी जनतेच्या प्रश्नी आवाज उठवण्याचे काम केले आहे. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे. प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केलं.

नारायण ज्ञानदेव पाटील असे त्यांचे पूर्ण नाव असून १५ जुलै १९२९ ला सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथे शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला. पहिल्यापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या एन. डी. पाटील यांनी अर्थशास्त्र विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले होते.

डॉ. अशोक भूपाळी यांनी एन.डी. पाटील यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. एन.डी. पाटील सर ८ वर्षे आपल्याकडे उपचार घेत आहेत. त्यांची एक किडनी काढली आहे, ११ जानेवारीला त्यांचं बोलणं बंद झालं, त्याच दिवशी काही तपासणी करून त्यांना अ‍ॅडमिट केलं गेलं होतं, अशी माहिती डॉ. अशोक भूपाळी यांनी दिली होती. अ‍ॅडव्हान्स ट्रीटमेंट देऊन त्रास होईल असे उपचार करू नयेत अशी त्यांची इच्छा होती, त्यामुळे कोणताही मोठा उपचार केला नाही, असं डॉ. भूपाळी म्हणाले होते. गेल्या चार दिवसांपासून पासून त्यांची शुद्ध हरपली होती. मेंदू बऱ्याच अंशी निकामी झाला होता, असं डॉ. अशोक भूपाळी म्हणाले होते.

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांना मे २०२१ मध्ये कोरोना संसर्ग झाला होता. त्यावेळी एन.डी. पाटील यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर एन. डी. पाटील यांना त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी खमकेपणाने साथ दिली.

सामाजिक, राजकीय जीवनात सर्वसामान्यांसाठी काम

एन.डी. पाटील यांनी १९५४-५७ या काळात छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर म्हणून त्यांनी काम केलं. १९६० मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य म्हणून कामं केलं. शिवाजी विद्यापीठ, रयत शिक्षण संस्था, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थांमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केलंय. शेकापमध्ये एन.डी. पाटील यांनी काम केलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देखील त्यांनी काम केलं.

मंत्री असूनही मुलाच्या इंजीनियरिंग प्रवेशासाठी वशिला लावला नाही

कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेते एन. डी. पाटील यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजणारा आणि नैतिक मूल्याची जपणूक करणारा एक आधारवड हरपला आहे. मंत्री असूनही मुलाच्या इंजीनियरिंग प्रवेशासाठी त्यांनी वशिला लावला नाही, मंत्री असूनही ते स्वत:चे कपडे स्वत:च धुवायचे, त्यांची राहणीमान अत्यंत साधी होती आणि अखेरपर्यंत सत्याची कास त्यांनी कधीच सोडली नाही, त्यामुळे एन. डी. पाटलांबाबत विरोधी विचारांच्या नेत्यांमध्येही आदरांचं स्थान होतं.

बाप मंत्री, पण मुलगा रांगेत

एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोजमाई यांनी एन. डी. पाटलांबाबत एक किस्सा सांगितला होता. त्यातून एन. डी. पाटील यांचं एक वेगळंच रुप पाहायला मिळालं होतं. एन. डी. पाटील हे सहकार मंत्री असतानाचा हा किस्सा आहे. पाटील हे सहकार मंत्री होते. त्यावेळी त्यांचा मुलगा सुहासला मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता. पण त्यांना दोन गुण कमी पडले. त्यावेळी वडील सहकार मंत्री आणि मामा शरद पवार हे मुख्यमंत्री असूनही सुहास यांच्यासाठी कोणताही वशिला लावला गेला नाही. पाटील यांनीही मुलासाठी खटपट केली नाही. सुहास यांनी मेडिकल ऐवजी इंजीनियरिंगला जायचा निर्णय घेतला. त्यांनी रांगेत उभं राहून इंजीनियरिंगला प्रवेश घेतला. फॉर्ममध्ये वडिलांचा व्यवसाय काय? असं विचारलं होतं. त्यावेळी सुहास यांनी शेती असं लिहिलं. वडील मंत्री असल्याचा कुठेही उल्लेख केला नाही. पवारांचीही ओळख सांगितली नाही, असा किस्सा सरोजमाई यांनी सांगितला होता.

मंत्री असूनही स्वत:च कपडे धुवायचे

एन. डी. पाटील हे अत्यंत स्वावलंबी नेते होते. त्यांनी सत्याची कायम कास धरली. त्यांनी नेहमीच पुढच्या पिढींसमोर आदर्श उदाहरणे ठेवली. मंत्री असतानाचा त्यांचा एक किस्सा प्रसिद्ध आहे. पाटील तेव्हा सहकार मंत्री होते. एक माणूस त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर आला होता. हा माणूस बंगल्यात बराच वेळ बसला होता. पण कोणीच येत नसल्याचं पाहून त्याने कानोसा घेतला. तेव्हा त्याला कपडे धुण्याचा आवाज ऐकायला आला. त्यामुळे त्याने थोडं पुढे जाऊन वाकून पाहिलं तर चक्क एन. डी. पाटील कपडे धूत असल्याचं त्याला दिसलं. त्यामुळे त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. पाटील यांनाही कोणी तरी आल्याची चाहूल लागली. त्या व्यक्तीकडे पाहून पाटील यांनी थोडं थांबा, मी आलोच. सुट्टी होती म्हणून कपडे धूत होतो असं या व्यक्तीला सांगितलं. मात्र, एवढ्या मोठ्या नेत्याला आणि मंत्र्याला स्वत:चे कपडे स्वत: धूत असल्याचं पाहून हा व्यक्ती मात्र अवाकच झाला होता.

अन् प्लॅटफॉर्म तिकीट नसल्याने घरी पाठवलं

संपत मोरे यांनी एन. डी. पाटलांचा सांगितलेला दुसरा किस्साही असाच आहे. एकदा पाटलांना नांदेडला जायचं होतं. संपत मोरे आणि पाटलांचे गाडी चालक परशुराम हे त्यांना सोडण्यासाठी सीएसटी रेल्वे स्थानकात आले होते. परशुराम यांनी पाटील यांची बॅग घेतली आणि स्टेशनचे पायऱ्या चढू लागले. तेव्हा पाटील यांनी पशुराम आणि मोरे यांना थांबवून तुम्ही घरी जा. मी जाईन. तुमच्याकडे प्लॅटफॉर्मचं तिकीट नाही. विदाऊट तिकीट आला तर तुम्हाला टीसी पकडेल असं सांगून त्यांना जायला सांगितलं. मोरे आणि परशुराम यांनी नको नको म्हटलं तरी पाटील यांच्या अट्टाहासामुळे या दोघांनाही स्टेशनमध्ये न येताच जावं लागलं.

शिक्षणप्रेमी, कष्टकरी, सामान्यांचा लढवय्या नेता (अल्पपरिचय)

पुरोगामी चळवळीतील जेष्ठ नेते, कष्टकरी, सामाजिक चळवळीतील कार्याचा वटवृक्ष आणि शिक्षणप्रेमी नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनाने एका युगाचा अस्त झाला आहे.

संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म,
शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ, १९५५; एल.एल.बी.(१९६२) पुणे विद्यापीठ

अध्यापन कार्य

१९५४-५७ छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर, १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२, शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५, शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-७८, शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-७८, सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१, रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून

राजकीय कार्य

१९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश, १९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस, १९६०-६६,१९७०-७६, १९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य, १९६९-७८, १९८५–२०१० शे.का.प.चे सरचिटणीस, १९७८-८० सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य, १९८५-९० महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी ), १९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

मिळालेले सन्मान / पुरस्कार

भाई माधवराव बागल पुरस्कार –१९९४, स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी १९९९, राष्ट्रीय बियाणे महामंडळ (अध्यक्षपद) भारत सरकार १९९८–२०००, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी २०००, विचारवेध संमेलन, परभणी अध्यक्षपद- २००१, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी, शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती, महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी, सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था, बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

प्रसिद्ध झालेले लेखन

समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका ) १९६२
कॉंग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका ) १९६२
शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका ) १९६३
वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट ( पुस्तिका ) १९६६
महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे ( White Paper ) कृष्णस्वरूप (पुस्तिका) १९६७
शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ( पुस्तक )१९७०
शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? ( पुस्तिका ) १९९२
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( पुस्तिका )
नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण २००१ (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाही समोरील आव्हाने)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button