मुंबई : मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रहिवासी आहेत. ते शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मुंबईत मंत्रालय परिसरात आले होते. यावेळी ते गार्डन गेटजवळ येऊन छोट्या बाटलीतील कीटनाशक प्यायले. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. यावेळी ते तिथे तैनात असलेल्या पोलिसांच्या नजरेस आले. पोलिसांनी त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला.
शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येची घटना काही वर्षांपूर्वी समोर आली होती. याच घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा घडली आहे. सुभाष जाधव यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरु होता. डॉक्टरांनी त्यांचा प्राण वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. पण त्यांची आज प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक घटनांवर मोठा फरक पडण्याची शक्यता आहे.
सुभाष जाधव यांच्या जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाली होती. त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. पण तिथे योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ते अस्वस्थ होते. आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी मंत्रालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते शुक्रवारी मुंबईत मंत्रालय परिसरात आले. तिथे त्यांनी मंत्रालयात जाण्याचा प्रवेश केला. पण त्यांना मंत्रालयात आत प्रवेश करण्यासाठी मज्जाव करण्यात आला. त्यामुळे त्यांनी मंत्रालयाच्या गेटसमोरच कीटनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.