फडणवीसांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये : भाई जगताप
मुंबईः देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, नैतिकता आमच्यात होती म्हणून आम्ही राजीनामा दिलेला आहे. भाजपमध्ये देखील असे अनेक नेते आहेत. केंद्रातही आहेत, राज्यातही आहेत. मात्र त्यांनी राजीनामे दिले नाहीत. १२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, मात्र सभागृहात आम्ही मागणी करून देखील कोणतीही कारवाई झालेली नाही, अशा शब्दात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेत्यांनी सुनावले आहे.
भाई जगताप यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सचिन वाझे प्रकरण गंभीर आहे. मात्र त्याने सांगितलं म्हणून ते गंभीर आहे, असं नाही. त्याची चौकशी करून त्याच्या मुळाशी जायला हवे, त्यातील सत्य काय आहे ते बाहेर पडले पाहिजे. ते सत्य देशाच्या जनतेसमोर आले पाहिजे. केंद्रीय यंत्रणेचा भाजपा गैरवापर करत आहे. मग ते सीबीआय असेल एनआयए असेल किंवा निवडणूक आयोग, यांचा गैरवापर नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने सुरू केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा माणूस हे सर्व षडयंत्र जाणीवपूर्वक करत आहे, असा गंभीर आरोपही जगताप यांनी केला.
काही दिवसांपूर्वीही भाई जगताप यांनी केंद्रावर निशाणा साधला होता. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे दिलं होतं. आज दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. या प्रकरणात कुणालाही अटक झालेली नाही. एवढेच नव्हे तर या प्रकरणाचा अहवालही अद्याप आलेला नाही. या चौकशीचं नेमकं काय झालं? असा सवाल भाई जगताप यांनी केला होता.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपाची सीबीआय चौकशी करणार आहे. 15 दिवसात ही चौकशी होणार आहे. अहवाल आल्यानंतर जी कारवाई व्हायची ती होईलच. तोपर्यंत त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही, असंही ते म्हणाले होते.