राजकारण

मंत्र्यांवर केवळ आरोप करण्यापेक्षा फडणवीसांनी पुरावे द्यावेत : आंबेडकर

नागपूर : राज्यातील मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला होता. यावर केवळ आरोप करण्यापेक्षा फडणवीस यांनी पुरावे द्यावेत असं आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे.

नागपूरमध्ये रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील काही मंत्र्यांनी वसुलीसाठी सॉफ्टवेअरचा वापर सुरू केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला होता. यावर बोलताना, फडणवीसांनी याबाबत पुरावे सादर केले पाहिजेत. राजकारणात खळबळ निर्माण करण्यासाठी कुणीही असे आरोप करू नये. कारण काही दिवसांनी लोक अशा आरोपांना करमणूक समजून गांभीर्याने घेत नाहीत, असा सल्ला आंबेडकर यांनी फडणवीसांना दिला.

चौकशी एजन्सीवर बंधने येण्याची गरज असल्याचे मत आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केले. कायद्याने छापा टाकल्यानंतर १९० दिवसांत एफआयआर दाखल होऊन प्रकरण न्यायालयात पोहोचणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांना १०० टक्के सूट देणे चूक आहे. काम करताना अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांचे बाहुले होऊ नये. असे प्रकार सर्रास होत असतानाही अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पाऊल उचलण्यात येत नसल्याची अशी खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली.

केंद्रीय तपास यंत्रणा जर कुठे धाड टाकत असतील तर त्या धाडीबाबतची माहिती आणि पुढील कायदेशी कारवाई निश्चित कालावधीत न्याय यंत्रणा आणि जनतेसमोर नेली जावी, अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button