मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे गुन्हेगारांशी संबंध असून त्यांच्याच आशीर्वादाने राज्यात बनावट नोटांचा खेळ सुरू होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेचचं ट्विट केलं आहे. डुकराशी कुस्ती कधीच खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे, असा हल्ला फडणवीस यांनी मलिकांवर केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून नवाब मलिकांच्या आरोपाला तत्काळ उत्तर दिलं आहे. यासाठी फडणवीस यांनी एका सुविचाराचा आधार घेतला आहे. कोणत्याही डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे. त्यामुळे तुम्हीही घाणीने माखून जाता आणि डुकरालाही तेच आवडत असतं, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली आहे.
Thought of the day 👇🏼 pic.twitter.com/PkLiHS3GVW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2021
आरोपांना उत्तर देणं टाळलं?
कोणतेही आरोप झाल्यानंतर फडणवीस मीडियासमोर येऊन प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. दिवाळीपूर्वी मलिक यांनी ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात अटक झालेल्या जयदीप राणाचे फडणवीसांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी काही तासात मीडियासमोर येऊन मलिक यांना प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, आज मलिक यांनी आरोपांची माळ लावल्यानंतर फडणवीसांनी केवळ ट्विट करून त्यांना उत्तर दिलं. तेही एका सुविचाराचा आधार घेत फडणवीसांनी उत्तर दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.