Top Newsराजकारण

नारायण सुर्वे, कुसुमाग्रजांच्या कवितांचा आधार घेत फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : दारुवरील कर कमी करणे, एसटी कर्मचारी आंदोलन, परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकरी मदत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मराठवाडा आणि विदर्भावरील अन्याय, अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. विधानसभा नियम २९३ अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर विधानसभेत बोलताना फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना कवी नारायण सुर्वे आणि कुरुमाग्रजांच्या कवितांचा आधार घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यात भयाण स्थिती आहे. राज्याला प्रशासक दिसत नाही. आगी लागतात, इथं कुंपनच शेत खात आहे. मुख्यमंत्री हे तेजस्वी पुरुषाचे वारसदार आहेत. त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी ही सदिच्छा असं फडणवीस म्हणाले. त्याचवेळी आज राज्याची अवस्था पाहून हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही प्रचंड वेदना होत असतील. स्वातंत्र्यदेवीची विनवणी आज इतकी खरी ठरेल, याची कल्पनाही कुणी केली नसेल, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या नाहीत. मात्र, दारुवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना फडणवीसांनी एका कवितेचा आधार घेत राज्यावर हल्ला चढवला.

सूर्यकुलाचा दिव्य वारसा
प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे
काळोखाचे करून पूजन
घुबडांचे व्रत करू नका

जनसेवेस्तव असे कचेरी,
ती डाकूंची नसे गुहा..
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका!

सत्ता तारक सुधा असे,
पण सुराही मादक सहज बने.
करीन मंदिरी,
मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका… अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केलीय.

कुसुमाग्रज सांगून गेले…किती परखड आहे बघा –

प्रकाश पेरा अपुल्या भवती,
दिवा दिव्याने पेटतसे…
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता,
शंखच पोकळ फुंकू नका

सरकारचे नेमके काय चालले आहे ? असा सवालही फडणवीस यांनी केलाय.

कविवर्य नारायण सुर्वे म्हणतात,
हे हात माझे सर्वस्व,
दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

सांगा, राज्याची स्थिती यापेक्षा वेगळी आहे का? असंही फडणवीस म्हणाले.

विदर्भ, मराठवाडा महाराष्ट्रात नाही का?

मुंबईसह महाराष्ट्र, बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र, हीच आमची भूमिका आहे. पण विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्रात नाही का? असा सवाल फडणवीस यांनी केलाय. वैधानिक विकास मंडळ काढून घेण्याचे पाप या सरकारनं केलं. ही कवच-कुंडले तुम्ही काढून घेतली. आता विदर्भ-मराठवाड्यावर अन्यायाची मालिका सुरु आहे. वीज सवलत बंद केली. नानाजी देशमुख कृषि समृद्धी योजनेचे निकष बदलून अन्याय केला. बळीराजा सिंचन अभियान मंजूर करवून आणले, आज सिंचनाची काम बंद होत आहेत, असं फडणवीस म्हणाले.

मराठवाडा वॉटरग्रिडचे काम थंडबस्त्यात आहे. त्यामुळे दुष्काळमुक्तीचे स्वप्न दुरावणार आहे. नदीजोड प्रकल्प आता नियोजनात नाही. अनेक योजना बंद किंवा संस्थगित आणि उर्वरित योजनांना हळूहळू बंद करण्याच्या तयारीत आहेत. वीज सवलत नसल्याने दोन उद्योग परत जाण्याच्या तयारीत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय.

पीकविम्याचे पैसे मिळत होते, तेव्हा मोर्चे काढले गेले. आज मिळत नाहीत तर मोर्चे काढणारे गप्प आहेत. आमच्या काळात विमा हप्त्याच्या ११२ टक्के पैसे मिळत होते. आज फक्त २० टक्के मिळत असल्याची टीकाही त्यांनी केलीय. पंतप्रधान मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेल्या ८ हजार ९१६ कोटींपैकी ७९३ कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांना या सरकारने दिलेच नाहीत. रोज कशाला खोटे बोलता, असा घणाघात फडणवीसांनी केलाय.

कुठे गेली तुमची कर्जमुक्ती? कुठे गेली शेतकऱ्यांची चिंतामुक्ती? वन टाईम सेटलमेंट योजना, ५० हजार रुपये प्रोत्साहनपर.. घोषणा होऊन दोन वर्षे झाली. ना शासन आदेश, ना अंमलबजावणी. शेतकऱ्यांची फसवणूक तर केली. पण महात्मा ज्योतिबा फुलेंचे नाव देताना किमान ती योजना फसवी नसावी, अशी टीकाही फडणवीस यांनी केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button