१२ आमदारांसाठी मराठवाड़ा, विदर्भातले लोक ओलीस ठेवले का?
देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना सवाल
मुंबई : १२ आमदारांसाठी मराठवाड़ा, विदर्भातले लोक ओलीस ठेवले का, असा सवाल करतानाच तिथली जनता कदापि माफ करणार नाही, असा इशारा विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी सुरु झाले. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. त्यानंतर विकास महामंडळ आम्ही स्थापन करु, बजेटमध्ये मी तसा निधी देऊ, ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करु, त्या आमदारांची नावं जाहीर करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांना दिले. त्यावर अजित पवारांना कोंडीत पकडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दादांचं पोटातले ओठात आले, १२ आमदारांसाठी मराठवाड़ा, विदर्भातले लोकं ओलीस ठेवले का? तिथली जनता माफ करणार नाही
कामकाज रेटून न्यायचं असेल तर आम्हाला बसवता कशाला? : फडणवीस
आमचं म्हणणं ऐकलं जात नसेल तर आम्ही एक मिनिट बसणार नाही, कामकाज रेटून न्यायचं असेल तर आम्हाला बसवता कशाला? असा सवाल करत फडणवीस चांगलेच आक्रमक झाले होते.
नाईटलाईफला कोरोना नसतो!
फडणवीस यांनी नाईट लाईफ आणि कोरोना निर्बंधांवरुन पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असून तिथं त्यांचेच चालते. आदित्य ठाकरेंनी सांगितल्यानं पब आणि बार बिनधास्त सुरु असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. कोरोना हा फक्त शिवजयंती आणि अधिवेशनाच्या वेळी असतो नाईटलाईफला नसतो, असा टोला देखील त्यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतात. म्हणून त्यांचेच मंत्री त्यांचे नियम धुडकावतात, असे फडणवीस म्हणाले.