राजकारण

सुभाष साबणे शिवसेनेतून बडतर्फ

मुंबई: शिवसेनेचे नाराज नेते सुभाष साबणे यांना शिवसेनेतून बडतर्फ करण्याचा निर्णय झाला आहे. देगलूरमध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार असेल. आघाडीच्या उमेदवाराचा शिवसेना प्रचार करेल, असं शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी सांगितलं.

अनिल देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. शिवसेनेत बंडखोरी केलेले सुभाष साबणे यांना शिवसेनेत ना बडतर्फ करण्याचा निर्णय झालाय. पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांचा दृढ विश्वास आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार नांदेडच्या पोटनिवडणुकीत निवडून येईल. शिवसैनिकानी शिवसेना भवनात येऊन तसा दृढ विश्वासच व्यक्त केला आहे, असं देसाई म्हणाले. तसेच सुभाष साबणे हे एवढे मोठे झाले नाहीत की शिवसेनेला त्यांनी सल्ला द्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेना संपवण्याचा प्रयत्न नांदेड जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण करत आहेत. उद्धव ठाकरे हे सज्जन आहेत त्यांना डावपेच माहीत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यात मास्टर झालेली लोक आहेत. पायातपाय घालण्यात आणि राजकारणात हे पीएचडी झालेली माणस आहेत. शिवसेनेचे यामुळे मोठं नुकसान आहे, असे गंभीर आरोप करत सुभाष साबणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. “माझ्या सारखी परिस्थिती अनेकांची आहे. माझ्या सारख्या अनेक लोकांची इच्छा आहे की शिवसेनेने आता या महाविकास आघाडीतून बाहेर यावं. आमदार आणि खासदारांची हीच इच्छा आहे. मी जर सहन करून बसलो असतो तर आता काँग्रेस ला मतदान मागितलं असतं आणि मग २०२४ ला कुणासाठी मतदान मागितलं असतं, असा सवाल सुभाष साबणे यांनी केला आहे. आज पंज्याला मतदान द्या असं म्हणायचं आणि मग २०२४ ला कुणाल मतदान द्या म्हणून सांगायचं?, असाही सवाल साबणे यांनी केला.

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मी काँग्रेसमध्ये, त्यांचा आणि माझा संबंध काय? : अशोक चव्हाण

दरम्यान, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी साबणे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांचा आणि माझा संबंधच काय? असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या पक्षाबाबत त्यांनी बोलावं, मी काँग्रेसमध्ये आहे, अशी आठवण करून देत त्यांनी साबणेंना चिमटा काढलाय. साबणे मुळातच शिवसेनेचे आहेत. मी काँग्रेस पक्षामध्ये आहे. मग त्यांचा आणि माझा काय संबंध?, असा सवाल करत साबणे यांनी शिवसेनेच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी, असं चव्हाण म्हणाले. तर जाणारा काहीतरी बोलून जातो, असं सांगायला देखील चव्हाण विसरले नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button