मोठी चूक झाली म्हणत एसटी कामगार संघटनांकडून सदावर्तेंची हकालपट्टी
खटल्यासाठी अॅड. सतीश पेंडसे यांची नियुक्ती
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात हवा भरणाऱ्या आणि विलिनीकरण होईपर्यंत संप सुरूच राहणार, असं सांगणाऱ्या विधिज्ञ गुणरत्न सदावर्तेंकडून हा खटला काढून घेण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्तेंऐवजी अॅड. सतीश पेंडसे यांची या खटल्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानातून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होत सरकारवर टीका करणाऱ्या सदावर्तेंना कर्मचाऱ्यांनी नाकारल्याचं दिसून येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. काही ठिकाणी एसटी सेवा सुरू झाली असली तरी बहुतांश ठिकाणी एसटी सेवा बंद आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी कृती समितीच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. तसेच परिवहनमंत्री अनिल परब आणि कृती समितीमध्ये एक बैठकही झाली. यानंतर बोलताना कृती समितीच्या काही सदस्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांच्या डोक्यामध्ये वकील गुणरत्न सदावर्तेंनी विलिनीकरणासंदर्भात भ्रम निर्माण केला आहे. कर्मचारी नैराश्यात असल्याचे वकील म्हणत आहेत. पण सदावर्ते हेच नैराश्यात आहेत. लोकांना भडकवण्याचे काम ते करत आहेत. दोन महिने सुरु असलेल्या संपामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्याची रोजीरोटी बंद होण्याची वेळ आली आहे, असे सुनील निरभवणे यांनी म्हटले आहे. तर, सदावर्ते यांना पत्र दिलंय.. आता आम्ही नवीन वकील सतीश पेंडसे यांना केस दिली आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो दोन्ही बाजूच्या लोकांना मान्य असेल. सर्व कर्मचाऱ्यांनी ताबडतोब सेवेत दाखल व्हावे, असं आवाहनही एसटी संघटनेच्या अजय कुमार गूजर यांनी केलं.