पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला
पालघर: शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक आहे. त्यावर संजय राऊत यांनी बोललं पाहिजे. त्यांनी शरद पवारांच्या पे रोलवर राहून बोलण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडाव्यात, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील हे पालघर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक आहे. त्यावर बोललं पाहिजे. पवारांच्या पे रोलवर राहून पवारांची बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडल्या पाहिजे. आम्हाला हिंदुत्व पाहिजे. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही आहोत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला तोच संदेश दिला आहे. पूर्वीच्या युतीत आम्ही समाधानी होतो. आताची युती नैसर्गिक नाही, अशा शिवसैनिकांच्या भावना आहेत. त्या राऊतांनी मांडल्या पाहिजेत, असा सल्ला पाटील यांनी दिला.
पवारांच्या घरी दिल्लीत आज विरोधी पक्षांची बैठक आहे. त्यावरही त्यांनी टीका केली. काँग्रेस, पवार कोण कधी काय करेल सांगता येत नाही. कोण कुणाला भेटतंय ते कळत नाही. देशाच्या राजकारणात काय चालंलय ते समजण्याच्या पलिकडे आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या आरोपाचंही खंडन केलं. केंद्रीय एजन्सी त्रास देत असल्याचं सरनाईक यांचं म्हणणं आहे. पण काही तरी घडल्याशिवाय कोणी त्रास देत नाही. आमच्याही कार्यकर्त्यांना त्रास झालाच आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आता सर्वच आमदारांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहे. त्यामुळे आता होणारे अधिवेशन पूर्ण कालावधीचं असलं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या अधिवेशनात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावर चर्चा झालीच पाहिजे. शेतकरीही नैसर्गिक आपत्तीमुळे खचून गेला आहे. त्यावरही चर्चा झाली पाहिजे, असं ते म्हणाले.