ओबीसी आरक्षणाबाबत नव्या मंत्र्यांकडून खूप अपेक्षा : पंकजा मुंडे
मुंबई: ओबीसींच्या आरक्षणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्य निवडणुका होण्याआधीच ओबीसींचा डेटा पूर्ण करा, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत नव्या मंत्र्यांकडून ओबीसी समाजाच्या खूप अपेक्षा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. ओबीसींचं आरक्षण सुरक्षित करून पुनर्स्थापित झाल्याशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नयेत. तो ओबीसींवर घोर अन्याय होईल. ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे. सरकारने तात्काळ पावलं उचलून हे थांबवणं आवश्यक आहे. या पोटनिवडणुका आहेत. मुख्य निवडणुकांच्या आधी तरी सरकारचा इम्पिरीकल डेटा आणि त्याचा अभ्यास होणं हे शंभर टक्के अपेक्षित आहे, असं पंकजा म्हणाल्या.
ओबीसींच्या आरक्षणप्रश्नी केंद्र सरकार अजून पिक्चरमध्ये नाहीये. कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्राकडे काही अपेक्षा असतील तर आपल्याकडे हक्काचे चार मंत्री आले आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत काहीही मदत लागली तर केंद्रातील नव्या मंत्र्यांनी सहकार्य करावं. महाराष्ट्रातून जे मंत्री झाले आहेत. त्यांच्याकडून ओबीसींच्या अनेक अपेक्षा आहेत, असंही त्या म्हणाल्या.
प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. म्हणून नाराज होण्याचं कारण नाही. माझ्या घरात कोणताही पूर आला नाही. माझं घर वाहून गेलं नाही. मी कुठेही आश्रित होण्याचा अर्ज करत नाहीये. मग माझं पुनर्वसन कोणी कशाला करेल? असा सवाल करतानाच जे बरबाद झालेत. जे वाहून गेलेत. जे खत्म झाले आहेत. त्यांचं पुनर्वसन केलं जातं. पुनर्वसन शब्द मला मान्य नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. माझ्या मनात कोणतीही आपत्ती नाही. हा पक्षाचा निर्णय आहे. अशा निर्णयातून मी गेली आहे. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल असते. नाराजी असते. हे नाकारता येत नाही. पण माझ्या आणि कुटुंबाच्या मनात नाराजी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. खडसेंना पुन्हा ईडीकडून बोलावणं येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर, खडसेंच्या चौकशीवर मीडियातून भाष्य करणं योग्य होणार नाही. कारण मी काही एक्सपर्ट नाही, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.