मुंबई : राज्यात शिवजयंतीनिमित्त आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन ठिकठिकाणी त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. महाराजांनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं आणि ते रयतेला अर्पण केलं. महाराज भोगवादी राजे नव्हते, ते रयतेचे राजे होते. शेतकऱ्यांचे कैवारी होते. कलावंतांचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य रयतेच्या कल्याणासाठी होतं.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीनं प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन जपला.
महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही, यापुढेही झुकणार नाही हा महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचं श्रेय सर्वार्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहीली आहे, यापुढेही तशीच राहील.
महाराज दूरदृष्टीचे नेते होते, बिकट प्रसंगात त्यांनी प्रसंगी तात्पूरती माघार घेतली, परंतु रयतेला धोका होईल, असा निर्णय घेतला नाही. महाराजांच्या या इतिहासातून आजच्या राज्यकर्त्यांनी धडा शिकला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जीवनातला कुठलाही प्रसंग, त्यांच्या कुठल्याही निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचं हित, जनतेचं कल्य़ाण, डोळ्यासमोर ठेवून, दूरदृष्टीनं घेतला होता, हे आपल्या लक्षात येईल.
शिवजयंतीसाठी नियमावली
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल. आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही शासनाकडून करण्यात आलं आहे. शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली होती. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.