Top Newsस्पोर्ट्स

टी-२० विश्वचषक : इंग्लंड सुस्साट ! ऑस्ट्रेलियाचा ८ गडी आणि ५० चेंडू राखून दारुण पराभव

दुबई : इंग्लंडनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केलं… गोलंदाजांच्या अफलातून कामगिरीनंतर इंग्लंडचे फलंदाज सुसाट सुटले आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजांना चोपले. जॉस बटरनं एकहाती फटकेबाजी करून ऑस्ट्रेलियाची हालत खराब केली. इंग्लंडनं हा सामना ८ विकेट्स व ५० चेंडू राखून जिंकून ऑस्ट्रलियाचं टेंशन वाठवलं आहे. आता त्यांच्या सेमी फायनलच्या मार्गात फार मोठी अडचण निर्माण झाली आहे.

इंग्लंडनं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस बोलावले. मागच्या सामन्यात फॉर्म परत मिळवणारा डेव्हिड वॉर्नर पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल व मार्कस स्टॉयनिस आज फेल ठरले. ऑस्ट्रेलियाचे हे चार दिग्गज २१ धावांवर माघारी पाठवून इंग्लंडनं सामना सुरुवातीलाच आपल्या मुठीत घेतला. मॅथ्यू वेड व कर्णधार अ‍ॅरोन फिंच यांच्याकडून संघर्षाची अपेक्षा होती. पण, ती फक्त फिंचनं पूर्ण केली. इंग्लंडनं सर्वच आघाडीवर आज वर्चस्व गाजवलं. गोलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या ख्रिस वोक्सनं घेतलेला झेल अफलातून ठरला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १२५ धावांत तंबूत परतला. त्यांच्याकडून अ‍ॅरोन फिंच ( ४४) एकटाच खेळला. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या सहा फलंदाजांना एकही षटकार मारता आला नाही, त्याउलट अ‍ॅश्टन अ‍ॅगर ( २), पॅट कमिन्स (२) आणि मिचेल स्टार्क (१) यांनी पाच षटकार खेचले. ख्रिस जॉर्डननं ३, वोक्सनं २ आणि टायल मिल्सनं २ विकेट्स घेतल्या.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना जेसन रॉय व जॉस बटलर हे तर ऑसी गोलंदाजांवर तुटून पडले. या दोघांचेही षटकार पाहण्यासारखे होते. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये इंग्लंडची पॉवर दाखवून देताना १०च्या सरासरीनं धावा कुटल्या. अ‍ॅडम झम्पाला ही जोडी तोडण्यात यश आली, रॉय ( २२) माघारी परतला. डेवीड मलान ( ८) यालाही अ‍ॅश्टन अ‍ॅगरनं माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाला आशेचा किरण दाखवला. पण, बटलरच्या फटकेबाजीसमोर त्यांचे स्वप्नांचा चुराडा झाला. जॉनी बेअरस्टोही या पार्टीत जॉईन झाला अन् त्यानंही थोडे हात साफ केले. बटलर ३२ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार खेचून ७१ धावांवर नाबाद राहिला. बेअरस्टो १६ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडनं हा सामना ८ विकेट्स व ५० चेंडू राखून जिंकला. इंग्लंडनं ११.४ षटकांत २ बाद १२६ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिका स्पर्धेत !

इंग्लंडनं ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्स व ५० चेंडू राखून दणदणीत विजयाची नोंद केली. इंग्लंडचा हा सलग तिसरा विजय ठरला आणि त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान हे जवळपास निश्चित झाले आहे. ऑस्ट्रेलियाचा हा ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ( चेंडूंच्या फरकानं ) सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला आणि या निकालानं ऑस्ट्रेलियानं स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला.

इंग्लंडनं सलग तीन विजय मिळवून ६ गुण व ३.९४८ अशा नेट रन रेटसह अव्वल स्थान मजबूत केलं आहे. या गटातून इंग्लंडचे उपांत्य फेरीतील स्थान पक्केच झाले आहे. इंग्लंडला उर्वरित दोन सामन्यांत श्रीलंका व दक्षिण आफ्रिकेचा सामना करायचा आहे आणि एक विजय पुरेसा आहे. दारूण पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट -०.६२७ असा झाला आहे. त्यांच्या खात्यात ४ गुण असले तरी आता त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिका हा तगडा स्पर्धक उभा राहिला आहे. आफ्रिकेनं आज श्रीलंकेला पराभूत करून ०.२१० नेट रन रेट व ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाला आता उर्वरित दोन सामन्यांत बांगलादेश व वेस्ट इंडिजाचा सामना करायचाय व त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील. आफ्रिकेसमोर बांगलादेश व इंग्लंडचे आव्हान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button