अॅडलेड: अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर शानदार विजय मिळवत मालिकेत २-० आघाडी घेतली आहे. अॅडलेड ओव्हलच्या मैदानावर झालेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा तब्बल २७५ धावांनी पराभव केला. यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी ४६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. काल चौथ्यादिवस अखेरीस इंग्लंडची वाईट अवस्था झाली होती.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी सहा विकेटची आवश्यकता होती. दुसऱ्या डावात इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने (४४) थोडाफार प्रतिकार केला. अन्य फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावात आटोपला. आज सकाळी डावाला सुरुवात केल्यानंतर इंग्लंडला ओली पोपच्या (४) रुपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर बेन स्टोक्सला (१२) धावांवर लेयॉनने पायचीत पकडले. इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि डेविड मलान यांच्यासारखे फॉर्ममध्ये असलेले फलंदाज काल स्वस्तात बाद झाले होते.
रिचर्डसनने भेदक मारा करत इंग्लंडच्या निम्म्या संघाला तंबूत पाठवले. वेगवान गोलंदाज स्टार्क आणि लेयॉनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणारा मार्क्स लाबुशेन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. यजमान ऑस्ट्रेलियाने या मालिकेत दमदार कामगिरी करत आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड २-० ने पिछाडीवर आहे.