परमबीर सिंग यांचीही लवकरच ‘ईडी’कडून चौकशी !
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित १०० कोटी रुपये वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरे तसेच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. त्याचबरोबर देशमुख यांचे दोन सचिव ईडीच्या कोठडीत आहेत. याप्रकरणी ईडीकडून तपास सुरुच असून आता ईडी अधिकारी लवकरच परमबीर सिंग यांना चौकशीचे समन्स बजावणार आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला वसुली करायला सांगत होते. देशमुख यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीच टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. याबाबत परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या आधारावर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्या जनहित याचिकेत मुंबई हायकोर्टाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.
या प्रकरणी सीबीआयने चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. ईडीने अनिल देशमुख आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यानंतर ईडीने विशेष कोर्टातून सचिन वाझे याची जेलमध्ये जाऊन चौकशी करण्याची काल परवानगी मिळवली आहे.
ईडीचे अधिकारी उद्या तळोजा जेलमध्ये जाऊन सचिन वाझे याची चौकशी करणार आहेत. सचिन वाझे याच्या चौकशीने तपासाची ही साखळी पूर्ण होत नाही. यातील मुख्य तक्रारदार परमबीर सिंग हे आहेत. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावणं ईडीला आवश्यक आहे. त्यामुळे सचिन वाझे याची चौकशी पूर्ण होताच परमबीर सिंग यांना ईडीचे अधिकारी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणार असल्याचं ईडीच्या सूत्रांच म्हणणं आहे.