राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना ईडीचे समन्स

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने आता राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना समन्स बजावलं आहे. चौकशीसाठी आजच ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना ईडीने दिल्या आहेत. त्यामुळे आता ईडीच्या चौकशीचा फेरा मंत्रलयातील बड्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केले. तसंच, पोलीस अधिकारी आणि प्रशासनातील बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा देखील आरोप करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर ईडीने गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना समन्स बजावलं आहे. कारण पोलीस अधिकारी आणि प्रशासनातील बदलाच्या आदेशावर कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निघायचे. त्यामुळे आज त्यांना ईडीने चौकशीसाठी ईडी कार्यलायत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.