मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) समन्स बजावले आहे. अनिल देशमुख यांच्या प्रकरणाशी आवश्यक माहिती ईडीला पाहिजे आहे. त्यासाठी ईडीने आता सीताराम कुंटे यांना समन्स बजावले आहे. कुंटे यांना २५ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. अनिल देशमुख यांची ईडी कोठडी २९ नोव्हेंबरला संपणार आहे.
मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यासाठी माजी गृहमंत्री देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. १०० कोटीच्या वसुली प्रकरणाची चौकशी करत असतानाच ईडीने या प्रकरणासंदर्भात सीताराम कुंटे यांना समन्स बजावलं आहे. अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना सीताराम कुंटे हे गृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली.