व्हीडिओकॉनच्या मालकांच्या मालमत्तांवर ‘ईडी’ची छापेमारी

मुंबई : मुंबईत ईडीचं धाडसत्र सुरुच आहे. ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती ताजी असताना आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. अर्थात हे प्रकरण वेगळं आहे. मात्र, कारवाई ही तितकीच मोठी आहे. ईडीने व्हीडिओकॉन या बड्या कंपनीशी संबंधित दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. व्हीडिओकॉनचे मालक राजकुमार धूत आणि वेणू गोपाळ धूत यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने मलबार हिल आणि गोवंडीत धाड टाकली आहे. आयसीआयसी बँक लोन प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
ईडीने एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. ईडीने मुंबईतील मलबार हिल आणि गोवंडीत धाड टाकली. त्याचवेळी औरंगाबादेतही धाड टाकली. एकाचवेळी ही सगळी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी आणि कार्यालयांमध्ये अशाचप्रकारे धाडी टाकल्या होत्या. अगदी त्याच पद्धतीने या प्रकरणातही ईडीने कारवाई केली आहे.
व्हिडीओकॉन ग्रुपला २०१२ मध्ये आयसीआयसीआय बँकेने ३२५० कोटींचं कर्ज दिल्याचं हे प्रकरण आहे. एकूण ४० हजार कोटींच्या कर्जाचा हा एक भाग होता, जे व्हीडिओकॉनने एसबीआयच्या नेतृत्त्वात २० बँकांकडून घेतलं होतं. २०१० मध्ये ६४ कोटी रुपये न्यूपॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड (NRPL) ला दिले. ही कंपनी धूत यांनी दीपक कोचर आणि इतर दोन नातेवाईकांसह मिळून उभी केली, असा आरोप आहे.
याप्रकरणी ईडीने गेल्यावर्षी ७ सप्टेंबर रोजी आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर करुन व्हीडिओकॉन कंपनीला कर्ज दिले असा आरोप आहे. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि व्हीडिओकॉन कंपनीचे मालक धूत यांनी मिळून एक कंपनी उभारली होती. या कंपनीलाही कोट्यवधींचा लोन देण्यात आला, असाही आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.
चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जदाराकडून आर्थिक लाभ दिले गेले, असा आरोप करण्यात आलाय. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यातच धूत यांनी कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या ट्रस्टला केवळ नऊ लाख रुपयांमध्ये विकल्याचाही आरोप आहे. ईडीने या प्रकरणात चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे प्रमुख वेणुगोपाल धूत आणि इतरांविरोधात बँकेच्या कर्जात हेराफेरी आणि PMLA अंतर्गत गुन्हा दाखल केला.




