पुणे : महाराष्ट्र वक्फ बोर्ड जमीन प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने गुरुवारी ७ ठिकाणी छापे टाकले. हे प्रकरण वक्फ बोर्डाशी संबंधित असलेल्या जमिनीच्या बेकायदेशीर विक्रीशी संबंधित आहे. विशेष म्हणजे वक्फ बोर्ड हे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे क्रुझ ड्रग्ज प्रकरणासंदर्भात एनसीबी आणि तपास अधिकारी समीर वानखेडे यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. तसेच नवाब मलिक यांनी नुकतेच माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत, असा आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असतानाच, आता ईडीने ही कारवाई केली आहे.
तत्पूर्वी, गुरुवारी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या कथित बदनामीकारक वक्तव्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवली होती. मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. आता या विधानाविरोधात नोटीस पाठवत समीर खान म्हणाले, त्यांच्या घरात ड्रग्ज सापडले नाहीत. यासोबतच त्यांनी फडणवीस यांच्याकडे ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. दुसरीकडे नवाब मलिक म्हणाले, फडणवीस यांनी आमच्यावर आरोप केले होते की आमच्या घरातून ड्रग्ज सापडले, माझ्या मुलीने त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना माफीही मागण्यास सांगितले. त्यांनी माफी मागितली नाही, तर मानहानीचा खटला दाखल केला जाईल.
विश्वास नांगरे-पाटील यांचे सासरे पद्माकर मुळे यांच्याविरोधात ईडीची कारवाई
औरंगाबाद शहरात आज बड्या उद्योजकांविरोधार ईडीने एकापाठोपाठ एक असे छापे टाकले आहेत. आतापर्यंत नेमक्या कोणत्या उद्योजकांवर ही कारवाई सुरु आहे, हे गोपनीय होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे जवळचे नातेवाईक पद्माकर मुळे यांच्यावर ईडीची रेड पडल्याचा खुलासा झाला आहे. तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरणाचा तपास मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे आल्यानंतर ही कारवाई झाल्याची चर्चा जोर धरत आहे.
बियाणे उत्पादक व्यावसायिक पद्माकर मुळे असे त्यांचे नाव असून ते शहरातले सरकारी ठेकेदार आहेत. तसेच संबंधित व्यावसायिक हे विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे आहेत. विशेष समीर वानखेडे प्रकरणाचा तपास विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वादाचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटल्याची चर्चा आहे.
वक्फ बोर्ड हा विभाग सध्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येतो. वक्फ बोर्डाच्या जमिनी भाडेतत्त्वावर देता येतात मात्र त्याची विक्री करता येत नाही. मात्र औरंगाबादमधील काही उद्योगपतींनी त्या इमारती भाडेतत्त्वार घेऊन त्यावर टोलेजंग इमारतीही बांधल्या आहेत. त्या इमारतीतील गाळे थेट रजिस्ट्री, खरेदीखत करून विकल्यादेखील आहेत. हा गैर व्यवहार शेकडो कोटींचा झाला होता. यासंदर्भातील तक्रारी ईडीकडे दाखल झाल्या होत्या. याविरोधात ईडीने तपाससत्र सुरु होतं. त्यानुसार औरंगाबादमध्येही ही धाड पडली आहे. या धाडींसाठी ईडीच्या ५४ अधिकाऱ्यांचे पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले असून व्यावसायिक आणि उद्योजकांची घरे व आस्थापनांवर छापे टाकले जात आहेत.