परमबीर सिंग प्रकरणात आता ईडी, सीबीआयची होणार एन्ट्री : चंद्रकांत पाटील
पंढरपूर: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं व विधान केलं आहे. परमबीर सिंग प्रकरणात आता ईडी आणि सीबीआयही येणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सत्तांतराला कोणताच मुहूर्त नसतो, असं विधानही त्यांनी केलं आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पंढरपूर येथे चंद्रकांत पाटील यांनी हे धक्कादायक आणि मोठं विधान केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला लगावला. आम्ही रात्री अथवा दिवसा सत्तांतराची स्वप्ने पाहात नाही. सक्षम विरोधी पक्ष म्हणून रोज रस्त्यावर उतरतो. यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबतची भाजपची भूमिका स्पष्ट केली. आमचा लॉकडाऊनला विरोध नाही. पण लॉकडाऊनमुळे गोरगरीबांवर उपासमार येणार आहे. गेलं वर्षभर त्यांचं नुकसान झालं. आता पुन्हा लॉकडाऊन केल्यास त्यांची उपासमार होईल. त्यामुळे आधी त्यांना पॅकेज द्या, मगच लॉकडाऊन करा, असं पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी एकत्र असली तरी राज्यात काय बोंबाबोंब आहे हे सर्वांना माहीत आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवरचा आहे. 70 लाख लोकांना महाराष्ट्रातील विजेची जोडणी कट करण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या आहेत. या जिल्ह्यात काही लाख लोक आहेत. पाणी असतानाही विजे अभावी या लोकांना शेतात पाणी देता येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे, असं पाटील म्हणाले. या सर्व प्रश्नावर आण्ही पंढरपूरची पोटनिवडणूक लढवणार आहोत. पाच वर्षात तुमची वीज कापली गेली नाही. पण या सरकारने ते करून दाखवलं आहे. मागचं सरकार आणि या सरकारमधील फरक काय हे लोकांना समजावून सांगणार आहोत, असंही ते म्हणाले. ही निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त करतानाच लोकांच्या मनातील उद्रेक मताच्या रुपाने बाहेर येईल, असंही ते म्हणाले.
पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रात सत्तांतर?
शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यानंतर एकीकडे भाजपचे प्रमुख नेते फोन करुन त्यांची विचारपूस करत असताना दिल्ली भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल (Navin Kumar Jindal) यांनी मात्र पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तब्येत बिघडण्याचा थेट संबंध सचिन वाझे प्रकरणाशी जोडला आहे.
नवीन कुमार जिंदल यांनी सोमवारी यासंदर्भात ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता तर वाटते की, ‘दाल मे कुछ काला नही, पुरी दालही काली है’, असे नवीन कुमार जिंदल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच शरद पवार यांची ही पोटदुखी पाहता, पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल, असे वाटत असल्याची खोचक टिप्पणीही नवीन जिंदल यांनी केली.
शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा फोन
राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना पोटदुखी आणि पित्ताशयाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली. अनेकांनी ट्विटरवरुन शरद पवार यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. यामध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या तब्येतीची विचारपूस केल्याचे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.