Top Newsराजकारण

विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव बिनविरोध

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता, भाजपा उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने सातव यांची बिनविरोध झाली. ही पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष तसेच विरोधी पक्ष भाजपाचे आभार मानले.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रज्ञा सातव यांना प्रमाणपत्र देताना विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. या मान्यवरांनी विजयी उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव या राजकारणात सक्रिय झाल्या. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं होतं. त्यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्षपद देवून पक्षाने मोठी जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्या हिंगोली कळमनुरीत सक्रिय झाल्या होत्या. महिलांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यापासून ते मतदारसंघातील कामांबाबतचा आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली होती. मधल्या काळात त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट घेऊन चर्चाही केली होती.

प्रज्ञा सातवांकडून मोदींवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदींच्या या निर्णयाचं देशभरातून स्वागत केलं जात आहे. शेतकऱ्यांनी जिलेबी वाटून या निर्णयाचा जल्लोष केला आहे. देशभरात जल्लोषाचं वातावरण असतानाच काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कृषी कायदे रद्द व्हावेत म्हणून संसदेत घोषणा देत असतानाचा त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काँग्रेस नेत्या आणि सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी हा व्हिडीओ पोस्ट करून आज राजीवजी असते तर आनंदी झाले असते, असं म्हटलं आहे.

प्रज्ञा सावत यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर एक पोस्ट टाकली आहे. अंहकाराचा पराजय आणि सत्याचा आज विजय झाला. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. जनरेट्यापुढे फॅसिस्ट शक्तींचा पराभव झाला आहे. शेतकऱ्यांचं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही. आज या शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजीव सातव राज्यसभेत लढले होते. त्यामुळे त्यांचे नेहमी स्मरण राहील, असं प्रज्ञा सातव यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button