शिक्षण

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण निगवेकर (७९ ) यांचे पुण्यात राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे शुक्रवारी ब्रेन ट्युमरने निधन झाले. ते गेल्या काही काळापासून कर्करोगाशीही झुंज देत होते. शैक्षणिक क्षेत्रासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

डॉ. अरुण निगवेकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. १९९८-२००० या काळात ते पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर कार्यरत होते. यानंतर २००० ते २००५ या कालावधीत त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद भूषवले होते. याशिवाय शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ‘नॅक’चे ते संस्थापक संचालक देखील होते.

भारतातील उच्च शिक्षण प्रणालीचा गुणवत्तेच्या अनुषंगाने मापदंड ठरवण्याच्या प्रणालीचा पाया डॉ. निगवेकर यांनी रचला आहे. शिक्षणाचं जागतिकीकरण व्हायला हवे असे मानणाऱ्या निगवेकर यांनी स्वत:देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक कामगिरी केली आहे. १९८० च्या दशकात ब्रिटनमधील योर्क विद्यापीठात तसेच कॅनडातील वेस्टर्न ऑटारिओ विद्यापीठात त्यांनी व्हिजिटिंग प्रोफसर म्हणून काम केले आहे. यूनेस्कोच्या एशिअन नेटवर्क ऑफ फिजिकल एज्युकेशनचे ते उपाध्यक्ष आणि आजीव सदस्य होते. फिजिक्स एज्युकेशन जर्नलचे ते संस्थापक संपादक होते.

शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनावर शिक्कामोर्तब करणाऱ्या नॅक (नॅशनल असेसमेंट अँड अक्रिडिटेशन काउन्सिल) संस्थेचे ते संस्थापक संचालक होते. शैक्षणिक क्षेत्रात विशेषत: उच्च शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापराचा त्यांनी प्रसार केला. उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेवर त्यांनी विशेष भर दिला. याच कारणाने ‘भारताचे मिसाइल मॅन’, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे निगवेकर यांचा उल्लेख ‘भारतातील शैक्षणिक गुणवत्तेचे पितामह’ असा करत.

भारतातील उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण आणि आधुनिकतेचा प्रवाह आणणारा महान वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांच्या निधनामुळे आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरूण निगवेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

डॉ. अरुण निगवेकर सरांनी देशातील शिक्षणाचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मोलाचे योगदान दिले. आयुष्यभर त्यांनी पदार्थ विज्ञाना सारख्या कठीण विषयात संशोधनासह अध्यापनाचे अनमोल कार्य केले. पुणे विद्यापीठात शैक्षणिक माध्यम संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आणि त्याचा लौकिक वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कुलगुरु म्हणून काम करताना त्यांनी पुणे विद्यापीठाला वेगळ्या उंचीवर नेले. ‘नॅक’चे संशोधन संचालक म्हणून डॉ.अरुण निगवेकर सरांनी भारतातील व्यापक आणि क्लिस्ट अशा उच्चशिक्षण पद्धतीसाठी गुणवत्ता मापन करण्याची सरळ आणि सोपी पद्धत विकसीत केली. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द संस्मरणीय राहिली. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला डॉ. निगवेकर सरांचे कार्य कायमच प्रेरणा देत राहील, त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील दिपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button