मुंबई : नांदेड इथं आम्ही न बोलवता सुद्धा ५० ते ७० हजार लोकं जमली होती. आवाज उठवायचा म्हटलं तर मी तेही करू शकतो. जर सरकार दखल घेत नसेल तर आम्हाला करायचं ते आम्ही करू शकतो. नांदेड फक्त एक झलक होती. तीही नं सांगता, मग सांगून बघू का? मग बघा अशा शब्दात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
कोल्हापुरात १६ जूनला मूक आंदोलन झालं. सर्व राज्यकर्ते, आमदार, खासदार यांनी जबाबदारी पाळली. आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनंती केली आणि चर्चेला बोलावलं. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. आरक्षण सोडून जे प्रश्न आहेत ते १५ दिवसात सोडवू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. २ महिने होऊन गेले तरी सरकार काहीही करत नाही, अशा शब्दात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
छ. संभाजीराजे म्हणाले की, सरकारने ठरवावं तेव्हा आम्ही बैठकीला बसण्याची तयारी आहे. पण सरकार तयार नसेल तर आम्हाला रायगडावर मूक आंदोलन घ्यावं लागेल. त्यासाठी तयारी आहे. पुन्हा नांदेडला जशी गर्दी जमली तशी गर्दी झाली तर आम्ही जबाबदार राहणार नाही. हे सरकारला चालेल का? समाजाला वेठीस न धरता एकटं आंदोलन करू ज्यामुळे गर्दी होणार नाही असंही त्यांनी सांगितले.
नांदेडला जे मूक आंदोलन झालं ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यातून लोकांच्या भावना दिसून आल्या. मुख्यमंत्र्यांनी जे पत्र दिलं. त्याचं उत्तर मी आज देत आहे. त्यांना मेल केलेला आहे आणि इथेही आणलेलं आहे. रिव्ह्यू पिटीशन दाखल केलेली आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. भोसले समितीचा अहवाल प्राप्त झाला पण पुढे काय? पुढचा अॅक्शन प्लॅन काय? हे काही ठरलेलं नाही. मला सरकारला प्रांजळपणे सांगायचं आहे. तुम्हाला असामान्य परिस्थिती निर्माण करायची आहे का? रिव्ह्यू पिटीशनचा निकाल आल्यावरच पुढची दिशा ठरवणार का? असा सवाल संभाजीराजे यांनी केलाय.
नवीन एक आयोग स्थापन करण्याची माहिती समोर आली ती मी पाहिली. पण आम्ही अजून दोन वर्षे थांबायचं का? सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करावं लागेल त्यासाठी काहीही केलं जात नाही. आम्ही कायदेशीर अभ्यास करत आहोत, असं उत्तर दिलं जात हे उत्तर आहे का? सिलेक्शन झालेल्या मुलांचा दोष काय? नियुक्त्या झालेल्यांचा दोष काय? ज्यांना एईबीसी मिळालं नाही ते परत ईडब्ल्यूएस मध्ये जाणार, मग पुन्हा ते कोर्टात जाणार. यावर तोडगा काढा म्हटल्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल असं सांगतात. ओबीसी प्रमाणे ज्या सवलती आहेत त्या मराठा समाजाला द्या, अशी मागणी केली तरी त्या दिल्या जात नाहीत, असंही संभाजीराजे म्हणाले.
मराठवाड्यात अतिवृष्टी झाली त्याचा मी दौरा केला होता. मागच्या वेळचे पैसेही सरकारने दिले नाहीत. त्यांना मदतीची गरज आहे. कोपर्डी बद्दलही पत्रात काहीही उल्लेख नव्हता. आम्ही कोल्हापुरात आंदोलन केलं, नांदेडमध्ये केलं. लोकांचा आक्रोश आम्ही पाहिला आहे. त्यांचा राग पाहिला आहे. त्यांना कसं आवरलं हे मला माहिती. सरकारला तोडगा काढायचा नाही का? असा सवालही संभाजीराजे यांनी केलाय.
हे पत्र मुख्यमंत्री किंवा सरकारमधील कुणीही तयार केलेलं नाही. अधिकारी वर्गानं तयार केलं आहे, हे आपण ठामपणे सांगू शकतो. जर यावर निर्णय झाला नाही तर संभाजीराजे समाजासाठी आझाद मैदानात एकटा बसेल, असा इशाराही संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिलाय.
विजय वडेट्टीवार समाजद्वेषी
विजय वडेट्टीवार हे समाजद्वेषी आहे. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी, अशी सूचना संभाजीराजे यांनी केलीय. मी छत्रपती घराण्याचा वंशज आहे. माझं एक प्रामाणिक मत आहे की, जो वंचित आहे त्याला आरक्षण मिळायला हवं. मी माझ्यापरिने प्रामाणिक प्रयत्न करतोय. कोण काय समाजाचे प्रश्न माडतं त्यापेक्षा ते किती मार्गी लागतात हे महत्वाचं आहे. विनायक मेटे प्रश्न मांडत असतात त्यांचं कौतुक आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.
माझी कुणीही दिशाभूल करु शकत नाही. मी माझे मुद्दे प्रमाणिकपणे मांडत असतो. संसदेत किंवा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे मी माझे मुद्दे स्पष्टपणे मांडले आहेत. आमची ताकद कमी पडत नाही. नांदेड आंदोलन ही एक झलक होती. कोरोनामुळे थोडं नमतं घेतोय, याचा अर्थ असा नाही की आम्ही कमी पडतोय. आम्ही सरकारला अल्टीमेटम देत नाही. पण सरकारनं याचा विचार करावा. आम्ही कधीही आंदोलनाला बसू, गर्दी झाली तर सरकार जबाबदार असेल, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिलाय.