Top Newsराजकारण

पुरोगामी महाराष्ट्रात पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळू नका !

नाना पटोले यांचा नारायण राणे यांना टोला

गोंदिया : नारायण राणे हे ज्या पक्षात आहेत, तो पक्ष पोथीपुराणावर विश्वास ठेवतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नसतो. पुरामुळे मृत्यू झालेल्या आणि पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम नारायण राणे यांनी करू नये, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला.

राज्याला प्रशासनही नाही आणि मुख्यमंत्रीही नाही. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का, असे वक्तव्य राणे यांनी केले होते. त्यानंतर याच वक्तव्याचा आधार घेत नाना पटोले यांनी राणे यांच्यावर पलटवार केला. “नारायण राणे हे ज्या पक्षात आहेत, तो पक्ष पोथीपुराणावर विश्वास ठेवतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नाही. मात्र, पुरामुळे अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांवर कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करु नये. तसेच मृतक आणि पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये, असे पटोले म्हणाले. ते गोंदियात पत्रकारांशी बोलत होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. यावेळी पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर टीका केली. राज्यात संकटं येत आहेत. त्याला कारण मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. ते आल्यापासून वादळं काय, पाऊस काय, कोरोना काय… सगळं चालूच आहे. कोरोना ही त्यांची देण आहे आपल्याला. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का, अशी खोचक टीका राणेंनी केली होती.

तो सीएम बीएम गेला उडत…

चिपळूण दौऱ्यात अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन त्यांची शाळाच घेतली. मात्र, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना राणेंचा तोल गेल्याचंही दिसलं. राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.

समोर जिल्हाधिकाऱ्यांनी सीईओ संबंधित ठिकाणी असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोण सीईओ आहे, मला कुणीही भेटलं नाही असं सांगितलं. मी बाजारपेठेत उभा आहे. कोण आहेत सीईओ? मला दाखवा, असंही नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं.

नारायण राणे यांनी आपल्या दौऱ्या दरम्यान अधिकारी उपस्थित नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. मात्र, असं करत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचाही अनादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलत असताना त्यांनी एकेरी भाषेचा उपयोग करत तो सीएम बीएम गेला उडत असं उद्दाम भाष्य केलं. त्यामुळे यावरुन राणेंवर टीकाही होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button